पान:मी भरून पावले आहे.pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चांगल्या शब्दांत सांग. त्याला नाराज करू नको." नगरकर ह्यांना फार जपत होते. मी फोन घेतला. यांचाच फोन. मला म्हणाले, "काय मेहरू, तू घरी पोचली ना? चांगली पोचली ना? आपली कॉन्फरन्स कशी झाली? तू मला सांग तुला कसं वाटलं?" म्हटलं, “मला काही कळत नाही." "तुला जेवढं कळतं तेवढं मला पुष्कळ आहे. लोक तर सांगतात, खूप छान झाली. तुला कसं वाटलं?" आणि मग मला असं वाटलं का हा माणूस माझ्यासारखीचं मत का घेत असेल? मला कळत नाही म्हटल्यावरसुद्धा तो पुन्हा विचारतो नि माझं मत घेतो म्हणजे त्याच्या नजरेमध्ये मी पण कोणतरी आहे. तर मी म्हटलं, "खरं सांगू, खूपच चांगली झाली. मला पण खूपच आनंद झाला. तुम्ही एवढं काम केलेलं आहे. मला फारसं कळलेलं नसलं तरी मला ही कॉन्फरन्स आवडली. खूप लोकं आलेली. एवढ्या मोठ्या लोकांना आपण भेटलो आणि सगळ्यांना तुम्ही मला इंट्रोड्यूस करून दिलं, ही माझी बायको आहे म्हणून.” मी एका कोपऱ्यात बसले नि माझ्याकडे लक्षच दिलं नाही असं काही झालेलं नव्हतं आणि एवढं सगळं झाल्यानंतर मला म्हणाले, "थोड्या वेळाने मी येतो. तू काय राग धरू नको. तुम्ही जेवून घ्या. माझ्यासाठी काही थांबू नका." हे आपला वेळ काढून घरी आले. घरी आल्यानंतर रागवायचं काही कारणच नव्हतं राहिलं. नगरकर म्हणाले, "बघ, मी काय सांगत होतो? हमीदच्या मनात काय आहे? उगाचच आपलं रुसायचं, रागवायचं. नवऱ्याला त्रास द्यायचा.” म्हणून परत चिडवायला लागले. आम्ही तिथं दोन दिवस होतो. वहिनी म्हणाली की, “तू हमीदच्यावर डिपेंडंट राहू नको. दिल्लीला इतक्या वर्षांनी आली आहेस. तुला फिरायला कुठे मिळणार? तर तुला टूरिस्ट गाडीमध्ये बसवते. तू एकटी जाऊन फिरून ये. मला वेळ नाही आणि मला झेपत पण नाही. मला घरात सगळं करायचंय. तर तू जा ना. गाडीमध्ये खूप लोकं असतात. तुला काय हरकत आहे?" असं करून दुसऱ्या दिवशी त्यांनी मला गाडीत बसवलं. मी जाऊन फिरूनबिरून आले. मला एकटंच फिरायला थोडंसं वाईट वाटलं. असंही वाटलं की नवरा असून आपण एकटं जातो. आपल्याबरोबर एंजॉय करायला तो नाही. पण मग माझ्या लक्षात आलं की आपण नवरा-नवरा करता कामा नये. वहिनीसुद्धा म्हणाल्या, “तू नवरा-नवरा करू नको. असं केल्यानंतर तो जखडून राहील. तो काम कसा करेल? तुझ्याकडून फुल् को-ऑपरेशन मिळालं नाही तर तो काहीही करू शकणार नाही. एवढं लक्षात ठेव. ह्या लोकांचं असंच असतं. हे मलाही आवडत नाही. पण मी असं बघितलंय. माझाही नवरा असाच आहे."

मी भरून पावले आहे : ८९