आणि त्या वेळी बांगला देशमध्ये जी स्वातंत्र्यासाठी चळवळ झाली तिला आम्ही सपोर्ट केला होता. अशा रीतीनं ही कॉन्फरन्स झाली. ही पहिली कॉन्फरन्स होती. मी पण त्यांच्या बरोबर गेले होते. कॉन्फरन्स काय हे मला काही माहिती नव्हतं. तिथं आम्ही नगरकरांच्या घरी राहिलो. दोन दिवसांची ही कॉन्फरन्स झाली. तिला नगरकरवहिनी आणि मी बरोबर गेलो होतो.
तिथं माझ्या काकाची मुलगी पण भेटली. धाकटी. तिनं सांगितलं का जाताना एक ब्लँकेट माझ्या वडिलांसाठी घेऊन जाशील का? हो म्हटल्यावर त्या हॉलमध्ये तिनं मला ते आणून दिलं. हॉलमध्ये दिवसभर आम्ही बसलो. बघितलं. लोकं आलेली. शिकलेला वर्ग होता. कॉन्फरन्स खूप चांगली झाली. एवढंच मला कळलं. बाकी काय मला कळत नव्हतं. संध्याकाळी सगळं संपल्यानंतर मी जेव्हा निघाले तेव्हा ह्यांचं त्या लोकांमधून लगेच घरी निघायला मन होईना. मला म्हणाले, "तू कुमुदवहिनींबरोबर जा. मी येतो नंतर." मी जरा चिडले. म्हटलं, "दिवसभर झालं ना, आता बास झालं. आता घरी चला. आपण दमलोय की नाही?" ते म्हणाले, "चल, चल तू घरी. मी येतो." तर वहिनी म्हणाली, “जाऊ दे. आज एवढी कॉन्फरन्स झाली, तो किती खुषीत आहे. सगळ्या लोकांना सोडून त्याला जाता येत नाही. तू कशाला लक्ष देतेस? चल आपण जाऊ." माझ्या हातात ते ब्लँकेट होतं. ते जड होत होतं. आणि मला एकटीलाच ते घ्यायला लागलं म्हणून मी आणखीनच चिडले. ते वहिनीच्या लक्षात आलं. तिनं ते ब्लँकेट घरी आणलं. घरी आल्याबरोबर नगरकरांना सांगितलं का "भाभी जरा फुगलीए. हमीद आला नाही ना, म्हणून तिला थोडासा राग आला आहे." तर ते मला चिडवायला लागले. "काय तुझा नवरा, एवढा मोठा सोशल वर्कर आहे. त्याने केवढी कॉन्फरन्स घेतली. तू खुषीत यायचं तर आपली फुगून बसलीस." सगळे जणच थट्टा करायला लागले. मी म्हटलं, “मी तर सोडून आलेलीच आहे ना. त्यांना कुठं इथं यावंसं वाटतंय. ते गप्पा मारण्यात मशगुल." नगरकर म्हणाले, "असं काही नाहीये. तुझी समजूत आहे ती." तितक्यात फोन आला, मला म्हणाले, “जा, जा, जा. तुझाच फोन आहे. हमीदचाच फोन आहे." मी म्हटलं, "नाही. मला फोन करायचं काय कारण? त्यांना तर आता माझी आठवणसुद्धा नसेल. मी काही फोन घ्यायला जाणार नाही." ते म्हणाले, "हे बघ, भाभी तू फोन घे. हमीदने तुला हे विचारायला फोन केलेला आहे की ही कॉन्फरन्स कशी झाली?" मी म्हटलं, “मला काय समजतं?" “अग, तू बघ आणि मग सांग. आणि तू खरं तेच सांग त्याला.