नगरकर मला सकाळी न्यायचे फिरायला. तिथं दलवाईंबद्दल बोलायचे, 'तू असं कर भाभी, तसं कर. हमीद असा आहे.' त्यांना इतकं प्रेम होतं. त्यांच्या कामावर इतके खूष होते की ते मला दलवाईंबद्दल सारखं कौतुकाने सांगायचे. वहिनी वेगळं सांगायची, ते वेगळं सांगायचे.
नंतर आम्ही दोन दिवसांनी गाडीनं आलो परत. फर्स्टक्लासचं तिकीट होतं. कूपेचं. कूपे म्हणजे काय, आपल्याला माहीत नव्हतं. तर मी म्हणाले, “आपल्या डब्यात दोनच सीट कशा आहेत?" हे म्हणाले, “याला कूपे म्हणतात आणि नुसते नवरा-बायकोसाठी असतात. तिसरा कोणी इथं येणारच नाही." आणि असं त्यांनी मला खूष केलं. परत जाताना मला असं वाटलंसुद्धा नाही की काही घडलंय नि आपण रागावलो होतो. अशा त-हेने आमचा तो पहिला मोठा प्रोग्रॅम झाला.
१९७३ च्या मार्चमध्ये मुंबईत मुस्लिम सोशल रिफॉर्म्स कॉन्फरन्स अशी एक कॉन्फरन्स झाली. त्याच्यात जवळजवळ २५० महिला-पुरुष सगळे मिळून होते. त्याच्यामध्ये ए.ए.ए. फैजी आलेले होते. फार महत्त्वाची गोष्ट आहे हं ही. त्यांच्यासारखा माणूस आपल्या कॉन्फरन्सला येतो! कुलसुम पारेख होत्या. ए.बी. शहा होते. मी पण ह्या कॉन्फरन्समध्ये भाग घेतला होता. एक ठराव इंग्रजीमध्ये लिहिलेला होता. आणि मला सांगण्यात आलं होतं की हे वाचून दाखव. तो वाचायला मला किती जड गेलं! माझं इंग्लिश चांगलं होतं. टाईप केलेला कागद बघून वाचायला काय लागतं? पण मला ते वाचतानासुद्धा घाम फुटला. कारण स्टेजवर जायची सवय नव्हती. नंतर माझी लोकांनी इतकी टिंगल केली. आमच्याच लोकांनी. काय, एवढं सुद्धा तुला वाचता आलं नाही? हे पण होते. गालातल्या गालात हसत होते. प्रो. मोइन शाकीर यांनी ती इनॉगरेट केली होती कॉन्फरन्स. दलवाई तिचे अध्यक्ष होते. ही कॉन्फरन्स सुद्धा खूप चांगली झाली.
१९७३ डिसेंबरला कोल्हापूरला कॉन्फरन्स झाली. शैक्षणिक. ७५० मुस्लिम्स आलेले होते. २०० स्त्रिया होत्या. सगळ्या महाराष्ट्रातून आलेल्या होत्या. त्यामध्येही काही रेझोल्यूशन्स पास केले गेले. ते काय होते? वक्फचा जो पैसा आहे तो मिसयूज कसा होतो? तो स्वतःच्या पर्सनल खर्चासाठी कसा खर्च होतो? राजकारणासाठी कसा होतो? त्याचा ट्रस्टींनी हिशोब द्यावा अशी मागणी केली होती. त्याच्यानंतर हा वक्फचा पैसा कशासाठी खर्च करावा? तर आम्ही त्यांना सुचवलं होतं मॉडर्न सायन्स बेस्ड एज्युकेशन, म्हणजेच विज्ञानावर आधारलेलं शिक्षण. असं शिक्षण मुलांना दिलं तर ती आपोआप आपल्या पायावर उभं राहू शकतील.