पण पोलीस चांगले होते, त्यांनी खूप चांगलं प्रोटेक्शन दिलं. हे लोक जेव्हा आमच्यावर तुटून पडले, तेव्हा मी व नजमा धावून बेस्टच्या डेपोमध्ये गेलो. त्यानंतर इथं बाहेर काठ्या, लाठ्या, तलवारी, सोडावॉटरच्या बाटल्या असा धुमाकूळ घातला. आम्हांला वाटलं, आमच्या सगळ्या लोकांच्या कत्तली झाल्या. आम्ही आत लपून बसलो दोन तास. इथं लढाई चालू होती. तिथं काय झालं? असं म्हणतात का तिथं पोलिसांची व्हॅन आली. त्यांनी आमच्या सगळ्या लोकांना भराभर आत बसवलं. बंद व्हॅन असते. व्हॅन बंद केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की मी व नजमा दिसत नाही. हे म्हणाले, 'बाबा रे, या दोघी बाहेर राहिलेल्या. मी काही जात नाही. मला खाली उतरू द्या, मला त्यांना शोधायला पाहिजे.' सगळे म्हणाले, तुम्हांला तर मारायला लोकं जमा झाली आहेत खाली. अब्दुल कादीर मुकादम म्हणाले, भाभींनी असं असं विचारलं होतं. भाभी नक्कीच डेपोमध्ये गेल्या असतील आणि मग ते उतरले. पोलिसांच्या प्रोटेक्शनमध्ये आत आले. मग पायधुणीला मोर्चा नेण्यात आला. आम्हांला मागच्या दाराने प्रायव्हेट गाडीतून पायधुणीला नेण्यात आलं. मधुभाई पंडित वगैरेंना किरकोळ मार लागला होता. आणि मग तिथं विचारपूस झाली. रात्री १२ ला आम्हांला घरी आणून सोडलं. नंतर २/३ महिने आमच्या घरावर पोलिसांचा पहारा असायचा. आणि मला अशी दहशत बसलेली होती. पहिला मोर्चा आणि दुसरा मोर्चा एकदम विरुद्ध. इतकी दहशत बसली की बाहेर जाताना भीती वाटायची की कोणी आपल्याला मारेल का, आणि मग माझ्या लक्षात यांच्या कामाचं स्वरूप आलं. हे जे करतात ते अशा टाइपचं कामच. बोहरा लोकांचा, त्यांचा धर्मगुरू सय्यदनांच्या विरोधात, जो व्हीटीला मोर्चा काढण्यात आला होता त्यात दलवाईंनी पुढाकार घेतला होता. त्या मोर्च्यात मीसुद्धा होते. मला आठवतंय, खूप गडबड झाली होती. ही चळवळ जवळजवळ दलवाईंनीच सुरू केली असं म्हणायला हरकत नाही. याबद्दल त्यांनी मारही खाल्ला आहे.
ए. बी. शहा इंडियन सेक्यूलर सोसायटीचं काम करत होते. प्रेसिडेंट होते. व्हाईस प्रेसिडेंट दलवाई होते. हे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचं काम करत होते. पैशाची अडचण असायची. नेहमी दोघांचे प्रोग्रॅम जॉईंटली व्हायचे. शहासाहेब ह्यांच्या कामात खूपच रस घ्यायचे. चार-पाच डिसेंबर १९७१ ला All India Forward looking Muslims Conference दिल्लीत झाली. त्यात जवळ जवळ १०० डेलिगेटस् आले होते, सगळ्या प्रांतांचे. त्यात रेझोल्यूशन पास केले गेले. समान नागरी कायद्याचा, फॅमिली प्लॅनिंगचा.
मी भरून पावले आहे : ८७