Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/101

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तुला यायचं असेल तर ये. तुला ऑफिसला सुट्टी घ्यावी लागेल.' मी म्हटलं, 'मी येणारच.' ऑफिसला अर्धा दिवस सुट्टी घेतली आणि मी तिथं मोर्चाला गेले. पहिल्या मोर्चाचा अनुभव होता ना, चुपचाप गेलो, आलो, काहीच झालं नाही, ही कल्पना घेऊन या मोर्चात गेले. तिथं गेल्यानंतर आमची लोकं उभी सगळी लायनीत. हातात फलक घेऊन. तिथं, त्या एरियात मुसलमानांची २००० घरं आहेत. आणि जागोजागी चार-पाच माणसं जमा झालेली मला दिसली. गट असे जमा झालेले. ते बघून मी थोडी घाबरले. अब्दुल कादीर मुकादम आमचे एक कार्यकर्ते होते. ते आधी बी.ई.एस.टी.मध्ये होते. त्यांना मी म्हटलं, 'मुकादम, हे लोक का हो जमा झाले आहेत?' ते म्हणाले, 'भाभी, तुम्ही लक्ष नका देऊ त्याकडे.' यांनी मुकादमला सांगितले होतं का तू भाभीला सांभाळ, तिला कसलीच कल्पना नाहीये. आणि ते पुढे आले. मी म्हटलं बोलता बोलता, इथे गडबड झाली मुकादम, तर जायला जागा कुठली? आपण कुठल्याही घरात शिरलो तरी मुसलमानांच्याच घरात शिरणार. तो तर आपल्याला ठेवणार नाही. मग आपण काय करायचं अशा प्रसंगात? तर त्यांनी सांगितलं, 'पुढे बेस्टचा डेपो आहे. तिथं आमचा चौकीदार बसलेला आहे. त्याला मी सांगितलं आहे आमचं कोणी आलं तर त्याला प्रोटेक्शन द्यायचं. तुम्ही काही घाबरू नका.

 आता मोर्चा सुरू झाला. आजूबाजूंनी २०० पोलिसांचा पहारा उभा, आणि समोर २००० चा मॉब उभा. मॉब आम्हाला मारण्यासाठी, लोकांची गर्दी मोर्चावर हल्ला करायचा नि तुटून पडायचं म्हणून आणि आमच्याजवळ थोडीशी माणसं आली. जेव्हा आम्ही स्लोगन्स द्यायला सुरुवात केली, तेव्हा येऊन अंगावर तुटून पडायला लागली. तेव्हा पोलिसांनी खूप प्रोटेक्शन दिलं. म्हणजे बेस्टचा डेपो येईपर्यंत पोलीस त्यांना बाजूलाबाजूला करत गेले. आणि मॉब जमा झाला खूप. पोलिसांच्या आटोक्यात राहिला नाही. सगळे इकडे तिकडे झाले. नजमा शेख जी होती ती ४-५ महिन्याची प्रेग्नंट होती. तिनं माझा हात घट्ट धरलेला होता, गंमत अशी की दलवाई असे चाललेले होते, त्यांच्याबरोबर प्लेन क्लोथ्समध्ये सी.आय.डी. पोलीस ऑफिसर चाललेले होते. आणि ते समोरचे जे लोक होते त्यांना हे माहिती नाही की हमीद कोण? हे पुढे चालले सिग्रेट फुंकत. त्यांच्या चेहऱ्यावर जरासुद्धा भीती नाही. अजून त्यांचा तो चेहरा माझ्या डोळ्यासमोर आहे. पोलीस त्यांना मागे ओढतील तर हे पुढे. पोलिसांना मागं सारून हा मनुष्य बेफिकीरपणे पुढेच चाललेला आहे. पोलिसांना जड जात होतं त्यांना थोपवणं.

८६ : मी भरून पावले आहे