पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

७३

 प्रसंगाशिवाय बोलूं नये व जें बोलावयाचें तें हितकर, सत्य, थोडें व गोड बोलावें.

 नशिबावर हवाला ठेऊन बसूं नये.

 वेळेचा दुरुपयोग करूं नये.

 ओळखीचा मनुष्य भेटला असतां प्रसन्न मुद्रेनें, सौजन्यानें व दयार्द्रहृदयानें कुशलादिक प्रश्न आपणच सुरू करावेत.

 जो कधीं कोणावर विश्वास ठेवित नाही किंवा सर्वांवरच ठेवितो किंवा एकटाच रहातो, तो कधींहि सुख पावत नाहीं.

 आपण कोणाचा शत्रु आहे किंवा आपला एकादा शत्रु आहे असें कोणाहि जवळ प्रगट करूं नये. आपला अपमान झाला असतां किंवा आपल्यावर वरिष्ठाची गैरमर्जी झाली असतां तेंहि प्रगट करूं नये.

 हलक्या गोष्टीनें आपलें मन दुखवून घेऊं नये व जी हानि अथवा गोष्ट व्हावयाचीच तिचा खेद करूं नये.

 दुसऱ्याचा आशय लक्ष्यांत आणून त्याशीं तसें वर्तन ठेवावें.

 इंद्रियांच्या अत्यंत स्वाधीन होऊं नये व त्यांनां अति क्लेशहि देऊं नये.

 गृहस्थाश्रम पत्करीपर्यंत ब्रह्मचर्यानें वागावें.

 नखें, केश, दाढी, मिशा हीं फार वाढूं देऊं नयेत.

 कर्ण, नासिकादि मलद्वारें स्वच्छ ठेवावीत.

 रोज स्नान करावें. चंदनादिक सुगंधांचें धारण करावें.

 स्वच्छ, चांगला व नम्र वेष धारण करावा. मलीन वस्त्रे धारण करूं नयेत.

 उन्हांतून जाणें झाल्यास छत्री घेऊन जावें व बाहेर जातांना पायांत जोडा घालावा. चालतांनां पुढे व आजुबाजूस लक्ष्य असावें.