पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?
७२
१४- सदाचरण.

 आपल्या वैद्यकग्रंथांमध्यें निरोगी रहाण्यासंबंधानें जे नियम सांगितले आहेत, त्यांत सदाचरणासंबंधाने लिहिले आहे. कारण सदाचरणाचा शारीरिक व मानसिक वृत्तींवर सुपरिणाम होऊन आरोग्याला तें मोठें साधन होतें व आपली जीवितयात्रा सुखमय होते ह्मणून प्रत्येकानें प्राचीन ऋषिवर्यांनी सांगितल्याप्रमाणें आपलें आचरण खालीलप्रमाणें शुद्ध व निर्मल ठेवावें.

 परमेश्वरास नेहमीं शरण जावें. आपला राजा, गुरु, वैद्य, वडील माणसें यांना सन्मान द्यावा.

 आपले कल्याण इच्छिणाऱ्या मित्रांशीं मोठ्या प्रेमानें स्नेह करावा; दुर्जनांपासून दूर रहावें.

 हिंसा, चोरी, व्यभिचार, चहाडी, अप्रिय, असत्य व असंबद्ध भाषण, दुसऱ्यांचा नाश करण्याची बुद्धि, मात्सर्य, शास्त्रविरुद्ध विचार यांचा कायावाचामनेंकरून त्याग करावा.

 गरीब, व्याधीनें पीडलेले व दुःखानें ग्रस्त झालेल्यांस यथाशक्ति साहाय्य करावें.

 कोणाचा विश्वासघात करूं नये.

 आपले नुकसान करणाऱ्या शत्रूवरहि प्रायः उपकारच करावा.

 श्रीमंतींत व गरिबींत एकच चित्तवृत्ति ठेवावी. संपत्ति आली असतां हर्ष किंवा गर्व करणें व विपत्ति येतांच शोक किंवा दीन होणें, असें असूं नये.

 एकाद्याच्या चांगल्या गुणाविषयीं ईर्षा करावी; पण तत्साध्य जें द्रव्यादिक त्याविषयीं करूं नये.