पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
मी निरोगी कसा राहीन ?

तळव्यांस तेल चोळावें अगर पाय थोडा वेळ गरम पाण्यांत धरावेत. ह्मणजे मेंदू शांत होऊन झोप येण्यास ठीक पडतें. निजण्याला फार रात्र करूं नये. रात्रीं लवकर निजून सकाळी लवकर उठणें, यासारखें आरोग्याला दुसरें साधन नाहीं. डोक्यावर पांघरूण घेऊन निजूं नये. फार थंडी वाजत असल्यास कान व डोकें एकाद्या स्वच्छ व हलक्या वस्त्रानें गुंडाळून गळ्यापर्यंत पांवरूण ध्यावें व तोंड आणि नाक उघडी ठेऊन निजावें. साधारणपणे जाणत्या माणसांनां सहापासून आठ तास झोंप पाहिजे. मुलांनां वयमानाप्रमाणे नऊपासून बारा तास पाहिजे. निजण्या उठण्याच्या वेळा ठरविलेल्या असाव्यात. चांगली झोंप लागून ढेकूण, डांस वगैरे आकस्मिक कारणांमुळे नव्हे तर सहजगत्या आपण जागे झालों ह्मणजे पुरेशी झोंप झाली असे समजावें. तरुण माणसांनी दिवसा झोंप घेणें बरें नाहीं. कारण, त्यामुळे आळस येतो, वेळाचा दुरुपयोग होतो; शिवाय प्रकृति बिवडते. वाग्भटकार ह्मणतात:- अकाली निद्रा, अति निद्रा व अयल्प निद्रा या मुख (आरोग्य) व आयुष्य यांची हानि करण्याविषयीं जशा काय दुसऱ्या कालरात्रीच आहेत. रात्रीची एक तासाची झोंप दिवसाच्या दोन तासांबरोबर आहे. ह्मणून ज्यांनां नोकरी- चाकरीमुळे जागरणाचा प्रसंग येतो त्यांनी या मानाने दिवसा झोंप घ्यावी. उताणें किंवा उपडें निजूं नये. कोणत्या तरी कुशीवर निजावें. कारण, उताणें निजल्यानें कण्यांतील मज्जारज्जूवर दाब पडतो व त्यास विश्रांति मिळत नाहीं. उपडें निजल्याने डोळे बिघडण्याचा संभव असतो. निजण्याचा बिछाना दक्षिणोत्तर असावा. झोपेसंबंधानें थोडक्यांत सांगावयाचें ह्मणजे

 निद्रायत्तं सुखं दुःखं पुष्टिः कार्य बलाबलम् ।

 वृपता क्लीवता ज्ञानमज्ञानं जीवितं न च ॥

-सूत्र०-वाग्भट.