पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६३

मी निरोगी कसा राहीन

अर्थः— सुखदुःख, पुष्टताकृशता,शक्तिअशक्तता,पुरुषत्व- घंढता, ज्ञानअज्ञान, जीवित व मरण या सर्व गोष्टी निद्रेवर अवलंबून आहेत. ह्मणून झोंपेंत कधीहि व्यत्यय न येईल, अशी खबरदारी घ्यावी, ह्मणजे आरोग्य प्राप्त झाल्याशिवाय रहाणार नाहीं.

 आहार, निद्रा व मैथुन यांचा योग्य उपयोग केल्यास ते घरास जसे खांब तसे शरीरास आधारभूत होतात.

१२-रहातें घर.

 कोणत्याहि माणसाची प्रकृति बरीवाईट असणें, हें तो ज्या घरांत राहतो या घरावर आणि त्याच्या आजुबाजूच्या स्थितीवर पुष्कळ अंशी अवलंबून रहाते. प्राचीन काळी आपले लोक घराच्या बांधणींत बहुत- करूत चोर व शत्रु यांपासून उपद्रव न होण्याबद्दलच्या मजबुतीकडे विशेष लक्ष्य देत असत; स्त्रियांच्या पडदानशीन रिवाजामुळे त्यांवर कोणाची नजर पडणार नाहीं, अशा तऱ्हेनें घराच्या आंतील बांधणी असे; खिडक्या, दरवाजे फार थोडे व अतीशय लहान असत, त्यामुळे घरांत अंधार असून वाज्यालाहि मोकळेपणी फिरण्यास मार्ग नसे. अशा प्रकारची घरें बेळगांव, शहापूर, पुणे, सातारा, कोंकण, गोवा वगैरे अनेक ठिकाणीं अजूनहि पहाण्यांत येतात. दिवसेंदिवस लोकांनां आरोग्याचें महत्त्व कळू लागल्यानें व दयाळु इंग्रज सरकारच्या राज्यांत पूर्वीप्रमाणें चोर व शत्रु यांचें फारसें भयही न राहिल्यानें घरांच्या बांधणीत आरोग्यदृष्ट्या बराच फेरफार दिसूं लागला आहे. लहानमोठ्या शहरांत रहाणाऱ्या पुष्कळ लोकांस स्वतःचें घर नसल्याने भाड्याच्या घरांत मिळेल तसल्या जागेत रहावें लागतें. असा वर्ग बराच मोठा असल्यामुळे तो जेथें भाडें कमी पडेल अशा ठिकाणी ह्मणजे चाळी आणि जुनीं घरें यांचा आश्रय करितो. अशा जागांपैकी कांहीं घरें