पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

तेव्हां डोळा चोळल्यानें ते न निघतां डोळ्यांत खुपूं लागतात. अशा वेळीं पापणी उघडून फिरवून पहावी व कण दिसून आल्यास तो स्वच्छ रुमाल घेऊन त्याच्या टोंकानें हळुच काढून घ्यावा. इतक्यानेंहि न निघाल्यास डोळा स्वच्छ पाण्याने धुवावा ह्मणजे ते निघून जातील. हे सर्व उपाय करून नेत्रांत गेलेले रजःकण नच निघाले, तर नेत्र- वैद्याकडे जावें. पुष्कळदां डोळ्यांत गेलेले रजःकण निघून गेल्यावरहि ते आंत असल्याचा भास होत असतो. असो. सकाळी उठल्यावर रोज तोंड धुतांनां डोळ्यांनां पाणी लावून ते स्वच्छ धुवावेत. तसेंच निजून उठल्यावर, बाहेरून फिरून आल्यावरहि धुवावेत. डोळे येणें हा रोग सांसर्गिक असून तो एकाचा दुसऱ्यास असा पसरतो. यासाठीं घरांत, शेजारींपाजारीं अगर इतर कोठेंहि हा रोग असलेला आढ- ळून येतांच अशा रोग्याशीं कपडेलत्ते किंवा इतर कोणत्याच रीतीनें संपर्क घडणार नाही, अशी खबरदारी घ्यावी. कडक उन्हांतून बराच वेळ फिरावें लागल्यास त्या वेळीं डोळ्यांस काळ्या कांचेचा चष्मा लावावा.  डोळे चांगले राखण्यासाठी आर्यवैद्यकांत ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या अशाः—

 सर्वदा च निषेवेत स्वस्थोऽपि नयनप्रियः ।

 पुराणयव गोधूमशालिपष्टिक कोद्रवान् ॥

 मुद्रादीन कफपित्तघ्नान् भुरिसर्पिः परिप्लुतान् ।

 शाकं चैवं विधं मांसं जांगलं दाडिमं सिताम् ॥

 सैंधवं त्रिफलां द्राक्षां वारि पाने च नाभसम् ।

 आतपत्रं पदत्राणं विधिवद्दोषशोधनम् ॥

-वाग्भट - उत्तरस्थान.