पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?
३८

सभोवतालच्या जमिनीवर दगडांची फरशी करावी व तिजवर दगडाच्या कपच्या, खडे व चुना यांची घट्ट जमीन करून बाहेरच्या बाजूस उतरती ठेवावी, व तिजवरून वहात आलेले पाणी जमण्याकरितां सभोंवार दगडाची किंवा काँक्रिटची पक्की मोरी असावी, व त्या मोरीं- तील पाणी दूर नेण्याकरितां दुसरी मोरी असावी. म्हणजे तें पाणी विहिरीसभोंवतीं जमून जमिनींत जिरणार नाहीं. असो. स्वच्छ पाणी झटलें ह्मणजे त्यास किंचित् निळसर झांक मारते, व कधीं कधीं करड्या रंगाचीहि झांक मारते. हिरवी झांक असलेले पाणी बहुधा. निरुपद्रवी असतें, व ही झांक त्याला पाण्यांत वाढलेल्या वनस्पतींच्या सूक्ष्म पशींपासून आलेली असते. परंतु पिंवळ्या व तपकिरी रंगाचें पाणी फार भयंकर असतें. कारण हा रंग बहुधा प्राणिज द्रव्यानें व मलमूत्राच्या घाणीनें वगैरे आलेला असतो. जे पाणी रंगहीन, स्वच्छ, गाळ न बसणारें, निवळ शंख व तेजस्वी असून त्याला कांहीं वाईट रुचि किंवा वास येत नसेल, तर तें पाणी चांगले व हितकर आहे असें ह्मणण्याला बहुधा हरकत नाहीं. पण तें नेहमीं गाळूनच प्यावें.

 पाण्याच्या शुद्धतेसंबंधानें जेव्हां संशय वाटतो, त्या वेळीं व गांवांत पटकी, टायफॉईड ज्वर, संग्रहणी वगैरे रोगांची सांथ असतां, पाणी नेहमीं उकळूनच प्यावें. हें सर्वांस सहज करितां येण्याजोगे आहे. पाणी कढविल्यानें खडू, लोखंड हीं तळीं बसतात. तसेंच पुष्कळ घाणेरडे वायु व सेंद्रिय द्रव्येंहि जातात आणि पटकी वगैरे रोगांचीं बीजें किंवा सूक्ष्मजंतू नाश पावतात. मात्र हे जंतू अगदी नाश पावण्याला पाणी चांगले उकळले पाहिजे.

 क्षार हे तर प्रकृति निरोगी रहाण्याला अत्यंत आवश्यक आहेत. निरनिराळ्या फळांतून आणि भाजीपाल्यांपासून हे मिळू शकतात.