पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

३१

तरी सहज मिळू शकतें; त्यासाठीं अडून रहाण्याचा प्रसंग येत नाहीं. तरुण व निरोगी माणसांनीं थंड पाण्याने स्नान करणे बरें. अशक्त व दुखण्यांतून उठलेल्या माणसांनीं साधारण गरम पाण्यानें स्नान करावें. कित्येक कढत पाण्यानें स्नान करितात; पण त्यापासून नुकसान होतें. गरम पाण्यानें डोक्यावरून आंघोळ करूं नये; कारण, डोळ्यांना इजा होण्याचा संभव असतो. पण सर्दी झालेली असेल किंवा व्यक्तीच्या स्थितीला अनुसरून वैद्यानें सल्ला दिली असेल तर डोक्यावरून गरम पाण्याने आंघोळ करण्यास हरकत नाहीं.

 स्नानाचें पाणी स्वच्छ निर्मल असावें. घाणेरडे किंवा मलीन असूं नये. स्नान करितांना डोळे, नाक, कान, तोंड, केंस, त्वचा वगैरे शरीराचा प्रत्येक भाग कोनकोंपरे नीटपणें धुऊन स्वच्छ करावेत. त्वचेवरील मल आणि चिकटपणा जाण्यासाठी रिमेल, पीअर्ससारख्या एकाद्या चांगल्या साबणाचा उपयोग करावा. चांगल्या सणण्याचे कारण अलीकडे निघालेले कांहीं साबण, त्यांत असलेली द्रव्यें योग्य प्रमाणानें मिसळ- लेली नसल्याने शरीराला अपायकारक होतात. कित्येक वस्त्राचा साबण आंगाला लावितात. असे करणें त्वचेला विघातक आहे. यासाठीं साबू वापरणें तो एकाद्या सुशिक्षित डॉक्टरला विचारून घेणें. ज्यांनां साबू वापरणे नसेल त्यांनीं चण्यांचें पीठ, आंवळकांठीचें चूर्ण, उडदांचें पीठ, शिकेकाई किंवा उटणे यांचा उपयोग करावा. हीं द्रव्यें साबणापेक्षां स्वस्त असून त्वचाशुद्धीला उत्तम असतात. स्नान दहा ते पंधरा मिनिटांत संपवावें स्नान करितांना व झाल्यावर वाऱ्याचा झोत आंगाला लागूं नये. कारण, त्यापासून शिरशिरी भरून ताप येण्याचा संभव असतो. ह्मणून स्नानाची जागा निवाऱ्याची व एकांताची असावी. स्नानानंतर सर्वांग सुक्या वस्त्रानें पुसून कोरडें