पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
मी निरोगी कसा राहीन ?

वाण जर आपण काढून टाकली नाहीं, तर त्यामुळे घाम येणारी छिद्र बुजलीं जाऊन घामाचा अवरोध होतो. घामाचा अवरोध झाला ह्मणजे मलमूत्रोत्सर्ग न झाल्यानें त्यापासून शरीरास जसा अपाय होतो, तसा यानेंहि होतो. त्वचेवर निरनिराळ्या जातीचे रोग होतात, सत्रग खाजतें, मूत्रपिंड सुजतात, आंगाला घाण येते व लोकही अशा माणसाजवळ येण्यास कंटाळतात. त्वचेचे दोन थर असतात. एक वरचा व एक खालचा. वरच्या थरांत किंवा त्वचेंत एपिथिलियमचे कित्येक थर असून - त्यांतील कणांत रंग असतो. काळेगोरेपणा या रंगावर अवलंबून असतो. जेथें विशेष घस असते अशा जागांवर (हातापायांचा तळवा) ही त्वचा ज्यास्त जाड व कठीण असते. खालच्या त्वचेंत रेषामय, चिवट व स्थितिस्थापक द्रव्य असून तिच्या खालीं चरबीचा थर असतो व तीवर फार बारीक असे तंतू पसरलेले असतात. या तंतूंमुळे आपल्याला स्पर्शज्ञान प्राप्त होतें. हे तंतू हातापायांच्या ठिकाणीं-विशेषतः पायापेक्षां हाताच्या बोटांच्या टोंकांत जास्त असतात. खालच्या त्वचेंत स्वेदोत्पादक पिंड, स्निग्धपिंड, केसांची मुळे असतात. स्नान केल्यानें आंगावरील मल धुतला जाऊन अंग स्वच्छ होतें, रोमरंध्रे मोकळी होतात, आंगांतील मल निघण्यास बरें पडतें, त्वगेंद्रिय जागृत रहातें, व मन प्रसन्न होतें. मात्र स्नान करणें तें, आंग चांगलें चोळून घांसल्याशिवाय केवळ डोक्यावरून कितीहि पाणी ओतलें तर उपयोगाचें नाहीं. सर्वांग नीटपणें चोळून आंगावरील मल धुऊन काढला तरच त्या स्नानाचा उपयोग आहे. लहान मुलें स्नान करीत असतां पालकांनी याकडे अवश्य लक्ष्य दिले पाहिजे. स्नानाला सकाळची वेळ चांगली. स्नान नेहमीं थंड पाण्यानें करण्याची सवय ठेवावी. त्यापासून रुधिराभिसरण जोराने चालतें व ज्ञानतंतू शांत होतात. शिवाय, थंड पाणी कोठें गेलें