पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

जीं निरनिराळी सुगंधी ह्मणून तैलें निघाली आहेत तीं याचींच वन- विलेली असतात. लोक त्यांत घातलेल्या सुगंधांनां भुलून त्यांचा उपयोग करितात; पण अशा तेलांत (व्हाइट ऑईलमध्यें ) पौष्टिक भाग नसल्यानें केसांचा काळेपणा जाऊन ते पांढरेच व्हावयाला लागतात. असो. एकंदरींत वरील कारणांमुळे निर्भेळ तेल मिळणे कठीण झाले आहे; करितां तेल घेणें तें खात्री करूनच घ्यावें. कित्येक लोक अंगाला तेल लावून किंवा नुस्तेंच अंग चेपून किंवा रगडून घेतात. याला चंपी असें म्हणतात. खरें पाहूं गेल्यास चंपीची जरुरी जे लोक व्यायाम न करितां नेहमीं बसून असतात अशा लोकांस विशेष असते. कारण चंपी करून घेतल्यानें व्यायामाची उणीव कांहीं अंशीं भरून येते. उत्तरहिंदुस्तानांत चंपीचें महात्म्य फार आहे. अभ्यंग हें रोज करावें, पण रोज करण्यास वेळ नसल्यास एक दिवसाआड किंवा आठवड्यां- तून एक वेळ तरी करावें, व हिवाळ्यांत तर अवश्य करावें. ज्यांनां ताप, अजीर्ण, अतिसार, उलटी वगैरे रोग असतील, त्यांनी अभ्यंग करूं नये.

७. स्नान.

 शरीरप्रकृति निरोगी असतां प्रत्येकानें रोज स्नान केले पाहिजे. कारण, ज्याप्रमाणें शरीरांतील मलमूत्रादि मलांचें उत्सर्जन होतें त्याच- प्रमाणे त्वचेवर असलेल्या असंख्य रोमरंध्रांतून घामाच्या रूपानें मल निघत असतो. घाम बाहेर आला ह्मणजे त्यांतील पाण्याची वाफ होऊन तो उडून जातो व त्यांत असलेलीं क्षारादि द्रव्यें त्वचेवर बसून रहातात. शिवाय, तेलासारखा एक स्निग्ध पदार्थ त्वचेवर येत असतो, त्यावर वातावरणांतून आणि कपड्यांतून अनेक तऱ्हेचे बाहेरचे रज:- कण व मल येऊन चिकटतात. अशा प्रकारची त्वचेवरील मलरूप