पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

घालणें, लांकडी घोडा वगैरे प्रकारांनी सर्व शरीरास व्यायाम होतो. हल्लीं शाळांतून चालू असलेली सँडोची व्यायामपद्धतीहि चांगली आहे. व्यायामांत नेहमीं फेरबदल करावा. नेहमीं किंवा एकसारखा एकच प्रकार चालू ठेवू नये. निरनिराळ्या प्रकारांनी मनालाहि आनंद होतो. याशिवाय आट्यापाट्या, खोखो, हुतुतू, चेंडुलघोन्या, चेंडुफळी, लॅॉन्टेनीस, फुटबॉल, बॅडमिंटन वगैरे खेळांनींहि मनाला आनंद होऊन व्यायामहि होतो. व्यायामानंतर कपडेलत्ते काढून टाकून वाऱ्यावर बसूं नये. तसेंच व्यायामानंतर लगेच जेवणे किंवा जेवून लगेच व्यायाम करणें बरें नाहीं. मध्ये कांहीं वेळ गेला पाहिजे. व्यायामानंतर जी तृषा लागते, ती शमविण्यासाठीं लगेच गटागट पाणी पिऊं नये. कांहीं वेळ थांबावें. मलशुद्धीनंतर व स्नानापूर्वी व्यायाम करणे बरें. व्यायामानंतर जें खाणें तें चहा, भजीं, चिवडा अशा प्रकारचें नसावें. थोडा वेळ स्वस्थ बसून मग दूध, तूप, लोणी, शिरा, पोळी, खारका, बदाम, अंडीं, मटनसूप वगैरे प्रकारचें पौष्टिक अन्न खावें. व्यायामांत मुख्यत्वेंकरून वसामय व सस्नेह पदार्थांचें अधिक प्रमाणांत दहन होत असल्याकारणानें तूप, लोणी वगैरे सारख्या पदार्थांचें सेवन केले पाहिजे. वाग्भटांत " अर्धशक्त्यानिषे- व्यस्तु बलिभिः स्निग्धभोजिभिः " व सुश्रुतांत " व्यायामोहि सदा पथ्यो बलिनां स्निग्धभोजिनाम् " असें ह्मटलें आहे, त्याचा हेतु हाच होय. यावरून व्यायाम करणारांस स्निग्धान्न पाहिजे, हें स्पष्ट होतें. ज्यांस गरिबीमुळे असें अन्न खातां येत नाही अशा लोकांनी भुइमूग, खोबरें, तीळ, हरभऱ्याची डाळ यांसारखें अन्न खावें. शेवटीं एवढे सांगणें जरूर आहे, की, व्यायाम हा शरीर निरोगी रहाण्यास अगदी आवश्यक आहे. वापरण्यांत न येणाऱ्या भांड्याला ज्याप्रमाणे गंज