पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

१५

वेगनिरोध केल्याने सर्वच रोग उत्पन्न होतात. यासाठी मलावरोधाचें कारण शोधून काढून त्याप्रमाणें व्यवस्था ठेवावी, अगर जरूर वाटल्यास एकाद्या अनुभवी वैद्याचा सल्ला घ्यावा.

 कित्येकदां असें पहाण्यांत येतें, कीं, शौचाला लागले असतांहि कांहीं लोक पहांटे उठण्याचा त्रास ह्मणून किंवा एकाद्या कामांत गुंतलेले असतां लगेच शौचाला जाण्याचा आळस करितात; त्यामुळे वेगाचा अवरोध होऊन मलावरोधाची सवय जडते. आपण जें अन्न खातों तें पोटांत गेल्यावर त्यांतील उपयुक्त भाग जितका शोषण होईल तितका अन्न- मार्गांत शोषण होऊन बाकी राहिलेला अवशिष्ट भाग मलरूपानें बाहेर पडतो. या मलरूप भागापैकी घट्ट असलेला जो अंश त्याला पुरीप किंवा मल असें ह्मणतात व तो गुदावाटे बाहेर पडतो, आणि द्रव असलेला जो अंश त्याला मूत्र असें म्हणतात व तो मूत्रमार्गे बाहेर पडतो. ज्याप्रमाणे घरांत सांचलेला केरकचरा वेळच्या वेळी रोज काढून टाकल्यानें घर स्वच्छ रहातें, त्याचप्रमाणे आपले शरीर निरोगी रहाण्याला ही मलरूप घाण रोजच्यारोज बाहेर गेली पाहिजे. अर्थात्, कितीहि जरी कामें असलीं तरी मलशुद्धि करण्याला मुळींच आळस करितां कामा नये. आर्यवैद्यककार म्हणतात, इहपरलोकी सुख इच्छिणाऱ्या मनुष्यानें इंद्रियदमन करून लोभ, ईर्ष्या, मात्सर्य, द्वेष, काम इत्यादि- कांच्या वेगांचा निरोध करावा; पण मल, मूत्र, अपानवायु, टेंकर, शिंक, तृषा, खोकला, क्षुधा, जांभई, बांति, अश्रु, रेत, निद्रा व श्रम- जन्य दम यांचा वेग स्वाभाविकपणे उत्पन्न झाला असतां त्याचा निरोध करूं नये, याचा हेतु तरी हाच होय.

 कित्येकांनी अशी वाईट सवय लावून घेतलेली असते, कीं, सकाळीं उठल्यावर चहा प्याल्याशिवाय किंवा तंबाखु ओढल्याशिवाय अगर