पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३

स्वराज्यसत्तेविषयी आपलेपणा वाटत होता, त्यांस मागें सारून ज्यांस स्वराज्य- सत्तेविषयीं आपलेपणा वाटत नव्हता, अशांकडून ती राजसत्ता चिरस्थायी कशी व्हावी ? शिवशाही सोडल्यास मराठ्यांच्या इतिहासांत असा प्रसंग क्वचितच आढळतो की, महाराष्ट्रांतील जनतेचें चित्त राष्ट्रीय कार्यात व्यग्र झाले आहे. पेशवाईत तर मूठभर व्यक्तींनी राजसत्ता करावी, व बहुजनसमाजानें उदास राहून तिचा उत्कर्ष पहावा. अशी त्यावेळी महाराष्ट्राची परिस्थिति होती. जातिभेदामुळे जातीजातींच्या संस्कृतीत इतकें अंतर पडलें होतें कीं, एका जातीला दुसऱ्या जातीच्या भावना आकलन करणें बहुतेक अशक्यच झालें होतें. त्यामुळे राष्ट्रीयत्वाचा जिव्हाळा उत्पन्न होणें अशक्य झालें. अशा स्थितीत कित्येक स्वसंरक्षणार्थ महाराष्ट्रांतून निघून गेले. पूर्वी दर्शविल्याप्रमाणें राखेत दडपलेली इंगळी दडपण नाहींसें होतांच आपले प्रखर तेज फांकू लागते, त्याप्रमाणें हे जिकडे गेले, तिकडे वाव मिळतांच आपलें तेज पसरूं लागले. त्याप्रमाणे विठ्ठलराव देवाजी हे स्वपराक्रमानें गायकवाडीत उदयास आले. हें प्रसिद्धच आहे. त्याच वंशांत बापुजी रघुनाथ हेहि स्वपराक्रमानें प्रसिद्धीस येऊन धार व ग्वालेरचे दिवाण झाले.

 ह्याच सुप्रसिद्ध घराण्यांत त्रिंबक मोरेश्वर यांनी पंतसचिषांचे दरबारी अनेक राष्ट्रहिताची कामे करून दप्तरदारी व कोटनिसी हे दरख मिळविले. त्याचप्रमाणे त्यांनीं मोसेखोऱ्यांतील दप्तरदारीचा दरख संपादन केला. त्यांस तीन पुत्र होते तेः– ( १ ) दाजीबा ( २ ) मैराळ व ( ३ ) खंडेराव, पहिले दाजीबा हे वडिलांचे मार्गे भोर संस्थानच्या दप्तरदारीचें काम करीत असतां, सचिवावर शत्रू चालून आला, त्याजबरोबर लहून त्यांनी सचिवाचा बचाव केला. त्याबद्दल सचिवानें त्यांस सालीना रु. ३०० व दप्तरदारीचा दरख करून -