पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करूं असे त्यास भरवून दिले. खनाची हा वेळपर्यंत पक्की खात्री झाला होती, कीं, शिवाजी दुर्बळ आहे. अर्थात तो आपल्या भेटीस येऊं शकणार नाहीं. परंतु तो आपणांस भेटणार आहे. अर्थात आलेली संधी वाया न दवडतां आपणच त्यांस भेटावें हेंच आतां योग्य आहे. ह्या वेळी खान आपल्या शहाणपणाच्या व शक्तीच्या घर्मेडीत होता. त्यास आपल्या वकिलाने आपल्या शत्रूंबरोबर संगनमत करून आपणांस फसवीलें आहे, हे त्याच्या स्वप्नींही आले नाहीं, म्हणूनच त्यांनी आपल्या वकिलाच्या मायावी भाषणांस संमत दिली.

 अफजुलखान शिवाजीच्या भेटीस येणार हे निश्चित झालें, दिवसही नक्की ठरला; हा दिवस मराठ्यांच्या इतिहासांत अत्यंत महत्वाचा होय. ह्या दिवसाच्या परिणामावरच महाराष्ट्राच्या भावी इमारतीचा पाया अवलंवून होता. त्या दिवसा करितां स्वराज्यसंस्थापकांचा आत्मा एकजीव झाला होता. तो दिवस पार पाडण्या- करितां त्यांचा अटोकाट प्रयत्न चालला होता. म्हणून तोच दिवस महाराष्ट्राच्या इतिहासांत सोनेरी अक्षरांनी लिहून ठेविला गेला. असो !

 ह्या दिवसाकरितां महाराजांनी प्रतापगडाखाली मंडपाची वगैरे व्यवस्था करवून आपल्या संरक्षणार्थ व्यवस्था केली ती :- बाबाजी भोसला, भीमातीरी होता, त्यांस वर्धनगड येथें पांच हजारी छावणी करून ठेऊन, महाबळेश्वराच्या घांट माथ्याचा बंदोबस्त करण्यास सांगितले. नेताजी पालकरांस रडतोंडीच्या घाटांत आपल्या सैन्यासह ठेविलें. रघुनाथ बल्लाळ कोरडे यांस दहाहजार लोकांसह दबा धरून मंडपाशेजारील जंगलांत बसण्यास सांगितले. मावळे दहाहजार, शामराज पद्मनाथ सातहजार व त्रिंबक भास्कर पांचहजार लष्करासह झाडीत दबा धरून बसविले. गडावर चिटणीस, पिंगळे व आण्णाजी दत्तो यांस ठेविलें.