पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

योग्य निवड आह्मांस करितां येईल. परंतु आमच्या पूर्वजांची चरित्रेंच लिहिली गेलीं नाहींत, तर हा भेद पारखणारांनी तरी कसा पारखावा !!

 सतराव्या शतकांत महाराष्ट्रांत जी अनेक नर-रत्ने आपल्या मर्दुमकीनें, साहसानें, व बुद्धिचातुर्यानें प्रसिद्धीस आलेली होती, त्यांची चरित्रें प्रसिद्ध झाली असतां आपणांस तद्वत् आपल्या भावी पिढीस त्यांच्या गुणांचा व कृत्यांचा आदर उत्पन्न झाल्यावांचून रहाणार नाहीं. ह्या हेतूने मावळा संरदार विश्वासराव नानाजी दिघे देशपांडे यांचें चरित्र आह्मी लिहिले आहे.

 या चरित्रांत चरित्रनायकांच्या घरण्याची प्राचीन माहिती जितकी उपलब्ध झाली तितकी दिली आहे. त्याचप्रमाणे, त्यांच्या पूर्वजांनी बहामनी राज्यांत व तदनंतर निजामशाही, अदिलशाही वगैरे राज्यांत स्वपराक्रमानें अनेक वतनें संपादन केली. त्याची हकिकत शक्य ती दिली आहे. मोगलांनी महाराष्ट्र आपल्या ताब्यांत आणण्याकरितां जे अनेक अघटित प्रयत्न केले, त्यावेळी महा- राष्ट्रांत सर्वत्र यवनशाही होऊन हिंदुचें नांव तरी राहतें किंवा नाहीं, अशी परि- स्थिति होऊन गेली होती. अशा भयंकर परिस्थितीत श्रीशिवाजी महाराजांनीं स्वातंत्र्याचें व स्वधर्माचें संरक्षण करण्याकरितां राजकारण चालू केलें ! ह्यावेळी चरित्रनायक विजापूरकरांचे अंकित असतांहि आपल्या स्वार्थाची किंवा अदिलशहाकडून होणाऱ्या शासनाची यतूकिंचितहि पर्वा न करितां, केवळ स्वधर्म संरक्षणार्थ ते शिवाजी महाराजांच्या राजकारणांत स्वयंस्फूर्तीनें येऊन मिळाले. तेव्हांपासून आमरण महाराष्ट्रास यवनांच्या जाचांतून मुक्त करण्याकरितां त्यांनी स्वराज्याची एकनिष्ट सेवा केली. या थोर पुरुषाच्या चरित्राची महाराष्ट्र यांस सांगोपांग माहिती मिळावी, या हेतूनें हें चरित्र