पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साक्ष पटवीत आहे. अर्थात चरित्रनायकांच्या कृत्याबद्दल शिवाजीस आश्चर्य कां वाटावें ? परंतु येथें आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे; कारण अफजुलखान स्वतः दुष्ट स्वभावाचा व घातकी असून, अति संशयी होता. त्यास यत्किंचितहि संशय आला, तर तो आपल्या पदरच्याहि मनुष्याचा शिरच्छेद कोणताहि विचार न करितां करीत असे, हें शिवाजीस अवगत होतेंच. अशा मनुष्याच्या तोंडाची बातमी आणणे हे किती धाडसाचें कृत्य, याची कल्पना वाचकानींच करावी.

 पंताजी गोपिनाथ खानाकडे जाऊन, त्यांनी त्यांस शिवाजीचा निरोप अति नम्रतेनें सांगितला, तो ऐकून खान फारच खूष झाला तो त्याच रात्री आपल्या खाशा मंडळींत बोलला की, माझी कृत्रीम मात्रा शिवाजीस चांगलीच लागू पडली. अहो ! शिवाजी आम्हांपुढे काय ! त्यानें केवळ पुंडाई करावी. अशा पुंडाई करणारास थोडेंसें आमिष दाखविलें की तेव्हांच ते वश होतात. अशा प्रकारें त्यांचें बोलणें चालले होतें. तें चरित्रनायकानें ऐकिलें, थोडक्याच वेळानें खानानें या आनंदाचे लहरींत पंताजी गोपिनाथाची भेट घेतली. त्या भेटींत असे ठरलें कीं, परस्परांच्या भेटी व्हाव्या, परंतु त्या कोणत्या ठिकाणी व्हाव्या, त्याचा निर्णय फक्त राहीला होता, तो शिवाजीकडून ठरवावा, असे त्याच बैठकीत त्याही ठरविलें.

 वरील हकिकत चरित्रनायकाने दुसऱ्या दिवशीं प्रातःकाळी, महाराज, मातोश्री जिजाबाई व बाळाजी आवजी वगैरे मंडळीस सांगितली. त्यावळी त्यांचा आलेल्या अरिष्टांतून पार कसे पडावें, हा खल चालला होता, इतक्यांत खानाची आपल्या मंडळी बरोबर व आपल्या वकीलाबरोबर झालेली संभाषणें त्याने सांगितली. त्या- वेळी शिवाजीनें चरित्रनायकाचें सर्व भाषण ऐकून घेतल्यावर म्हणाले की खानाचें कपट मी आतां पूर्ण जाणून आहे. जिवावर बेतलेल्या प्रसंगी जशास तसे केल्यावांचून गत्यंतर नाहीं. कपटाने दुसऱ्याचा घात करणे फार कठीण असतें. मी आतां