पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पकडून आणण्याकरितां, एक पिंजरा, इतकी सामुग्री त्यानें आपल्याबरोबर घेतली. अशा थाटानें तो विजापुरांतून बाहेर पडला.

 अफजुलखान प्रचंड सैन्य घेऊन आपणांवर येत आहे. ही बातमी रायगडावर शिवाजीस कळली. तेव्हां त्यास विचार पडला की, अफजुलखानासारखा प्रचंड योद्धा, आपणावर चालून येत आहे. त्याजबरोबर उघड्या मैदानांत लढाई करून, आपली धडगत लागणार नाही. हे जाणून शिवाजी प्रतापगडावर निघून गेला. ही हकिगत अफजुलखानास कळतांच तोही शिवाजीचा विध्वंस करावा, ह्याबद्दल नानाप्रकारच्या युक्त्या योजीत व मनःक्षेत्रावर मनोराज्याचे मनोरे उभारीत प्रतापगडाच्या रोखानें, वाईप्रांती आला. वाटेत त्यानें हिंदुची अनेक देवालयें उध्वस्त केली. देवाच्या मूर्तिही फोडल्या, असा तो घोर कृत्ये करीत आला. त्याचप्रमाणे मलवडीच्या बाजी निंबाळकरास पकडून त्याचे हाल हाल केले. ह्यावरील दुष्ट कृत्यामुळे तेथील बहुतेक लोक त्याजवर फार संतापले होते.

 शिवाजी प्रतापगडावर गेल्याची बातमी अफजुलखानास कळली, तेव्हां त्यास प्रथम आनंद वाटला. कारण त्यास त्या प्रांताची चांगलीच माहिती होती. व आतां आपण त्यास सहज चिमट्यांत धरूं अशी आशा त्याच्या मनांत प्रादुर्भूत झाली. या आशेनंच आजपर्यंत किती तरी लोकांना रसातळास नेलेलें आहे बरें ! शिवाजीवर आपण एकदम तुटून पडल्यास त्याचें आपल्या सैन्या- पुढे कांही चालावयाचें नाहीं. त्याच्या थोड्याशा लोकांना आपण जरजर करूं. अशी त्याला घमेंड होती तरी पण न जाणो ! मराठ्यांचा, तशांत, मावळ्यांसारख्या कडव्या व पराक्रमी लोकांशी गांठ आहे. आपल्या दरबारी व खानदानी कदाचित् असल्या डोंगराळ प्रदेशांत आपल्या