पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४

होणें शक्यच नव्हते. त्याच्या उलट शिवाजीकडील सरदारांत स्वाभिमान व स्वदेशाभिमान ह्या अमुल्य गुणांचा संग्रह झाल्यामुळे अपयश प्राप्त होणे शक्यच नव्हतें.

 शिवाजीस चरित्रनायकांसारखे जे कित्येक मावळे व इतर सरदार येऊन मिळाले ते केवळ स्वाभिमान व देशाभिमान ह्या दोन गुणानी युक्त असे होते. म्हणूनच त्याचे प्रयत्न सुफलित झाले. चरित्रनायक आपले स्वहित सोडून स्वातंत्र्याकारतां आपला देह झिजविण्यास उद्युक्त झाले, म्हणूनच त्यांना यवनी राज्यावर तीव्र आघात करून तें धुळीस मिळवितां आलें, व मराठी राज्याची इमारत अल्पावधीत उभारतां आली. ही इमारत उभारण्याकरितां चरित्रनायक शिवाजीच्या राजकारणाच्या प्रारंभापासून स्वराज्याच्या मोहिमेंत दाखल झाले, व त्यांनी अनेक पराक्रमाची कार्ये करून, आपला देशाभिमान ह्या महाराष्ट्राच्या इतिहासांत चिरंतन करून ठेविला. तसेच अनेक विश्वासाची कामे पार पाडली. त्यामुळे शिवाजीचें त्याजवर फारच प्रेम जडलें होतें, म्हणूनच त्यांची खाजगी मंडळांत नेमणूक झाली. त्या त्यांच्या पराक्रमाचा उल्लेख, इतिहासांत विशेष प्रसि- द्धपणें झालेला दिसत नाही. परंतु त्यांनी जे कित्येक महत्वाचे पराक्रम केले, त्या सर्वांत अफजुलखानाच्या वधाचे वेळी जें धाडसाचें कृत्य केले. तें फारच अव- र्णनीय होते. त्याचा उल्लेख पुढील भागांत देण्यांत येईल.