पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 चरित्रनायक शिवाजीच्या राजकारणांत येऊन मिळाल्यानंतर थोडक्याच दिवसांत रोहीड खोऱ्यांतील कुळकर्ण्याचा मुलगा दादजी नरसप्रभु हाहि शिवाजीबरोबर स्वराज्याची शपथ घेऊन त्यांच्या राजकारणांत स्वयंस्फूर्तीनें येऊन मिळाला. हें वर्तमान विजापूर दरबारी बांदल देशमुख, खोपडे व जेधे देशमुख वगैरेंनी कळविलें. तेव्हां विजापूराहून दादजी नरसप्रभु यांचे वडीलांस आपला सुलगा शिवाजीच्या राजकारणांत मिळाला आहे. त्यास त्यापासून परा- वृत्त करावें, म्हणून धमकीचें पत्र आले. त्यावेळी नरसोबावा फारच हवालदील झाला. व आतां आपके पारिपत्य अदिलशहा खास करणार, असे त्यांस वाटलें. ही हकिकत शिवाजीस कळली. त्यावरून शिवाजीनें दादजी नरसप्रभुस शके १५६७ वैशाख शुद्ध १ चें पत्र लिहिलें तें: - ( रा. खं. १५ पृ. २६८ ) 'तुम्हांस मेहरबान वजिराचा विजापुराहून हुकूम आला तो ठाणें सिरवलाहून अभिमानी तुम्हाकडे पाठविला त्याजवरून तुमचे बाप नरसिबावा हवालदिल झाले, वगैरे कितेक बहुतेक लि ॥ त्यास शाहासी बेमानगिरी तुझीं व आम्ही करीत नाही श्री रोहिरेश्वर तुमचे खोरी यांतील आदिकुलदेव तुमचा डोंगरमाथा पठारावर शेंद्रीं लगत स्वयंभू आहे. त्यांनी आह्मांस यश दिलें व पुढें तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरवि- णार आहे त्यांस बावास हवाल होऊं नये खामाखा सांगावा आणि तुझीं तो कागद घेऊन सिताब हुजूर येणें राजश्री श्रीदादजीपंताचें विद्यमानें बावाचें व तुमचें व आमचें श्रीपासी इमान जाले ते कायम वज्रप्राय आहे. त्यांत अंतर आह्मीं व आमचे वंशज लेकराचें लेकरी वतन वगैरे चालविण्याविसी कमतर करणार नाहीं हें राज्य व्हावें हें श्रीचे मनांत फार आहे याप्रमाणे बावाचे मनाची खातरी करून तुझीं येणें " वरीलप्रमाणें शिवाजींचें आश्वासन, व मोठें बोधपर पत्र दादजी नरसप्रभु यांस आलें.