पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ३ रा.
स्वराज्यसेवा.

मागील भागांत शिवाजीमहाराज विजापूरास गेले, हें निदर्शिलेंच आहे. तेथें असतांना त्यांनी यवनांची नीच कृत्यें प्रत्यक्ष पाहून, त्यांच्या ओजस्वी बाण्यास ती त्यांची कृति सहन झाली नाहीं. तेव्हांपासूनच आपण यवनाचें दास्यत्व कधीहि पत्करणार नाहीं. असा त्या बालवयांत त्यांनी निश्चय केला. सन १६४३ त शिवाजीमहाराज विजापुराहून पुण्यास परत आल्यावर आपल्या वडिलांनीं जहागिरीच्या व्यवस्थेकरितां ठोवेलेल्या मंडळांपैकीं, रघुनाथ बल्लाळ कोर्डे सोनोपंत डबीर वगैरे जे आपणांस सहाय्य झाले, ते व आपले बाळ- मित्र येसाजी कंक, तानाजी मालुसरे, दादजी बापुजी, चिमणाजी बापुजी देशपांडे वगैरेबरोबर संगनमत करून स्वराज्य स्थापण्याकरितां निर- निराळीं राजकारण करूं लागले. तेव्हां त्यांहिं प्रथम जें कार्य आरंभिलें तें डोंगरी पहाडांतून रात्रंदिवस हिंडावें, तेथील लोकमतांचें निरीक्षण करावें, स्वराज्य स्थापण्यास जे आपणांस सहाय्य होण्यास अनुकूल असतील, त्यांस आपल्या राजकारणांत घ्यावे. हा क्रम सुमारे दोन वर्षे चालवून, पुढे स्वातंत्र्याची मोहीम इ. स. १६४३ त सुरू केली. त्यावेळी शहाजीराजे यांनी स्वराज्य स्थापण्याचें राजकारण केलें होतें, त्याचा विसर मावळांतील लोकांस हा वेळपर्यंत पडला नव्हता. अर्थात शिवाजी हा शहाजीराजे ह्या महाप्रतापी पुरुषाचा मुलगा आहे, हे जाणून आसपासचे प्रांतांतील देशमुख, देशपांडे वगैरे घराण्यांतील अनेक जवानमर्द