पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग २ रा.
बाळपण व तत्कालीन परिस्थिति.

या दिघे देशपांडे घराण्यांतील जी कित्येक नर-रत्ने बहामनी राज्यांत व त्यानंतर त्याचे विभागांत, आपल्या मर्दुमकीनें व मुत्सद्दीगिरीनें प्रसिद्धीस आली. त्यांचा पुढे निजामशाहीच्या अखेरीस मोगलांच्या अफाट सेना- समूहाबरोबर टिकाव लागला नाही, हे जरी खरें होतें, तरी त्यावेळी त्यांस कोणाच्या तर्फेनें लढावें, ह्याचीच शंका त्यांस बहुशा कारणीभूत झाली होती. त्यामुळे त्यांस कांही काळ सह्याद्रीच्या खोऱ्यांत स्वस्थ बसावें लागलें होतें. तथापि राखेंत दडपलेली इंगळी जशी उघडी होतांच आपलें प्रखर तेज वाऱ्या बरोबर फाकूं लागते, त्याप्रमाणेंच ह्या वीरांस वाव मिळतांच त्यांनी आपले क्षात्र- तेज प्रगट करून, आपले नांव महाराष्ट्राच्या इतिहासांत अजरामर करून ठेविले. पुढे त्यापैकी कित्येक शहाजीराजे भोसले यांचे आमदानीत उदयास आले आहेत. अस्तु !

 पहिल्या भागांत निर्देशिल्याप्रमाणे मीठप्रभूनें ८४ गावाचें वतन स्वपराक्रमानें संपादिले, त्यावरून पहातां हा पुरुष पराक्रमी असावा, हे निश्चित होते. त्याचे पश्चात त्याचा मुलगा कानप्रभु हा वडिलांच्या वतनाची व्यवस्था मर्यादित ठेऊन होता. व त्याचप्रमाणे पुढील दोन पिढ्या आपल्या वतनाचें संरक्षण करून व योग्य वेळी आपल्या शत्रूंस आपल्या पराक्रमाची