पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इनामें वतनें वगैरे देत असत. ह्याचप्रमाणे पुढे निजामशाहीत व अहिलशाहीत ही चाललें होतें. ” *

मीठप्रभु हे मोसेखोरें येथे आल्यानंतर त्यांनी स्वपराक्रमानें ८४ गांवाचे देशपांडे व कुळकर्णपणाचें वतन संपादन केलें. ह्याठिकाणी चरित्रनायकांच्या पूर्वी सहा पिढ्या हैं वतन उपभोगीत होत्या, हें सोबत दिलेल्या वंशावळीवरून सिद्ध होतेंच.

दुसरें जोगदप्रभु हें उंबरडी तर्फ निजामपूर येथे येऊन राहिले. हें मागें दिलेंच आहे. उंबरडी हैं ठिकाण पालीपासून सुमारें दहा कोसांवर डोंगरांत निसणीचे घांटाखाली सह्याद्रिपर्वताच्या पायथ्याशी आहे. त्यावेळी तेथें कोळी राजाची राज- धानी होती. त्याच्या आश्रयास जोगद रभु येऊन राहिला. यास चार पुत्र होते, ते सोबत दिलेल्या वंशावळीवरून समजेलच. त्या प्रत्येकांनी निरनिराळ्या ठिकाणी वतनें संपादन केली. तीं अनुकमें:- भूतप्रभूनें पौडखोरें येथील देशकुळकर्ण व गांवकुळकर्णाचें वतन संपादिले. अमराजीनें मुठें खेोरें येथील कुळकर्ण संपादिलें. जैनप्रभुनें कसबे पौड व नांदेडे येथील कुळकर्ण संपादिलें व कुकप्रभु हा कोंकणांत गेला. ह्या प्रमाणें जोगदप्रभुच्या पुत्रांची माहिती उपलब्ध झाली आहे. पुढे ह्या घराण्यांतील बरेंच पुरुष आपल्या परक्रमानें प्रसिद्धीस आलेले आहेत; परंतु त्यांच्या शाखेची माहिती येथे देणें इष्ट नसल्यामुळे ती दिली नाहीं, तरी

त्यांची माहिती यथाकाळी देण्यांत येईल.


 सरदेसाईकृत मराठी रियासत पा. १६६-१६७.