पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्वोच्च लैंगिक सुख (ऑरगॅझम)

 स्त्रीला लैंगिक सुखाचा उच्चतम बिंदू आला की तिच्या जननेंद्रियांच्या अवतीभोवतीच्या नसा आकुंचन पावतात व ती लैंगिक सुखाच्या लहरी अनुभवते. एकच नाही तर एका मागोमाग एक अशा अनेक लहरी ती अनुभवू शकते. बहुतेक स्त्रियांना याचा अनुभव आलेला नसतो. (कारण आपल्याला हा उच्चतम लैंगिक बिंदू येऊ शकतो याची जाण अनेक स्त्रियांना नसते.). जननेंद्रियांच्या अवतीभोवती नसा आकुंचन पावताना जर योनीत खूप स्राव तयार झाला असेल तर तो स्वाव योनीच्या बाहेर येतो. काही वेळा स्त्रियांच्या बारथोलिन ग्रंथींचा स्राव योनीतून बाहेर येतो. (या स्रावाकडे बघून काहींचा गैरसमज होतो की हे स्त्रीचं वीर्य आहे. स्त्रीमध्ये वीर्य तयार होत नाही.)

जननेंद्रियातील शिथिलता

 परमोच्च लैंगिक सुखाचा बिंदू अनुभवल्यावर शरीर सैल पडतं. पूर्णपणे गळून गेल्यासारखं वाटतं. रक्तदाब कमी होतो. जननेंद्रियांतील रक्तप्रवाह कमी होतो. स्तनांची बोंडं मऊ होतात.

  अनेक वेळा पुरुषांकडून प्रश्न येतो, की "पुरुषाला परिश्रम पडतात, स्त्रीला का थकवा येतो? ती अनेक वेळा न थकता संभोग का करू शकत नाही?" पुरुष विसरतात की संभोग स्त्रीच्या शरीरात विविध बदल घडवतो. त्याचबरोबर हा मानसिक अनुभवही आहे. त्यामुळे दोघांनाही मानसिक व शारीरिक थकवा येणं स्वाभाविक आहे.

या संशोधनातील उणिवा

 काही महिलांचा वरील दिलेल्या आराखड्याला विरोध आहे. त्यांच म्हणणं असं, की या संशोधनात स्त्रियांचा लैंगिक सुखाचा आराखडा पुरुषांच्या लैंगिक सुखाच्या आराखड्यावर बेतलेला आहे. म्हणून पुरुषांप्रमाणेच स्त्रीच्या सर्वोच्च सुखाच्या बिंदूकडे लक्ष केंद्रित केलं गेलं आहे. स्त्रीला लैंगिक सुखाचा परमोच्च बिंदू न अनुभवतासुद्धा पुरेपूर सुख मिळू शकतं, तिला 'ऑरगॅझम' आला नाही तर तिनं

अपराधी वाटून घ्यायचं काहीही कारण नाही.

 दुसरा मुद्दा असा, की स्त्रीची शिस्निका हा अत्यंत संवेदनशील अवयव आहे. शिस्निकेला स्पर्श करून, कुरवाळून, चाटून स्त्री खूप उत्तेजित होते व स्त्रीला शिस्निकेपासून खूप लैंगिक सुख मिळतं. हा आराखडा फक्त लिंग-योनीमैथुनावर लक्ष केंद्रित करतो, शिस्निकेला पुरेसं महत्त्व दिलं गेलेलं नाही.

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

७९