पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रत्येक पुरुषाच्या उत्तेजित लिंगाची लांबी वेगळी असते. उदा. काहीचं ४ इंच, काहींचं ५ इंच, काहींचं ६ इंच इत्यादी. सरासरी बघता पुरुषाच्या उत्तेजित लिंगाची लांबी ४-५ इंच असते. योनीची लांबी सरासरी ६ इंच असते.

 अनेक पुरुषांना आपल्या उत्तेजित लिंगाची लांबी पुरेशी आहे का, याबद्दल असुरक्षितता असते. म्हणून आपल्या जोडीदाराला पुरेपुर लैंगिक सुख देऊ शकू का, ही काळजी असते. इतर पुरुषांच्या उत्तेजित लिंगाची लांबी बघून असुरक्षित वाटायचं कारण नाही, कारण योनीमैथुन करताना जर उत्तेजित लिंग २ इंच किंवा त्यापेक्षा मोठं असेल, तर तो पुरुष, स्त्रीला पूर्ण सूख देऊशकतो. याला कारण स्त्री उत्तेजित झाल्यावर स्त्रीच्या योनीमुखापासून पहिला २ इंच योनीचा भाग फुगून 'ऑरगॅझमिक प्लॅटफार्म' तयार होतो. या भागाला लिंगाचं जास्त घर्षण होतं. योनीच्या आतल्या भागात कमी संवेदनशीलता असते. म्हणून उत्तेजित लिंग किती लांब आहे याच्यावरून लैंगिक सुख ठरत नाही.

 काही पुरुष मला प्रश्न विचारतात, की “माझं लिंग खूप लांब आहे. ते योनीतून गर्भाशयात जाणार तर नाही ना?" नाही. कारण गर्भाशयाचं मुख खूप छोटं असतं. त्यातून लिंग आत जात नाही.

संभोग

 लिंग योनीत घालून संभोग करताना लिंगाला योनीच्या घर्षणानं सुख मिळत असतं. संभोग चालू असताना वीर्यपतन होण्याआधी कधी कधी लिंगातून १-२ थेंब कोपरग्रंथीचा पारदर्शक स्राव येतो (प्रिकम).

 संभोग किती वेळ चालेल हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. सरासरी बघता पुरुषाचा संभोग ४-५ मिनिटं चालतो. (उदा. एखादया व्यक्तीला पहिल्यांदा संभोग करताना वीर्यपतनाला कदाचित २ मिनिटं लागतील. अर्ध्या एक तासानं परत संभोग करताना ४ मिनिटं लागतील.) आपण किती दिवसानंतर संभोग करतो आहोत, आपलं वय काय आहे, आपण किती आतुर आहोत, आपल्याला संभोगाचा काही त्रास होतोय का? आपण दारू/नशा किंवा काही विशिष्ट औषध घेऊन संभोग करतो का? आपल्याला जननेंद्रियांची संवेदनशीलता कमी करणारे आजार आहेत का? अशा असंख्य गोष्टींवर आपला संभोगाचा कालावधी अवलंबून असतो.

वीर्यपतन

 संभोग करताना वीर्यपतन होणार याची जाणीव हळूहळू पुरुषाला व्हायला लागते. ही जाणीव अत्यंत सुखकारक असते व तो आनंद जास्त मिळवावा किंवा तो क्षण तसाच पकडून धरावा अशी इच्छा होते. पण एक वेळ अशी येते की वीर्यपतन

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

७७