पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इतर कोणतेही आजार होत नाहीत. तोटे कोणतेच नाहीत. कुठेही तुम्ही हस्तमैथुनाचे दुष्परिणाम वाचले असतील तर त्याला वास्तवाचा काहीही आधार नाही, हे पक्कं लक्षात ठेवा.

 'पुरुष किंवा स्त्रीनं हस्तमैथुन करून कोणताही अपाय होत नाही' असं सांगितलं, की कार्यशाळेत लगेच दुसरा प्रश्न येतो - "माझं अभ्यासात लक्ष लागत नाही, सारखे सेक्सचे विचार मनात येतात. हस्तमैथुन करावासा वाटतो, तो दिवसातून किती वेळा करावा?" मी स्पष्ट म्हणतो, “कोणाला दररोज एकदा करून समाधान वाटतं, तर कोणाला दिवसातून तीन वेळा करून समाधान वाटतं. पाहिजे तेवढ्या वेळा करावं. आपण जेवढे लैंगिक इच्छांचे विचार दाबतो तेवढं आपलं अभ्यासात लक्ष लागत नाही. हस्तमैथुन करून मन शांत होतं, तर मग तो करून अभ्यासाला बसा."

शारीरिक स्वच्छता

जोडीदारांनी शारीरिक स्वच्छता पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी-

  • चुंबन घेणार असाल तर तोंडाला सिगारेटचा वास नसावा. तोंडात गुटखा, तंबाखू नसावी. तोंड स्वच्छ धुतलेलं असावं.
  • जननेंद्रियांवरचे केस योग्य ते हेअर रिमूव्हर लावून काढावेत किंवा कात्रीने कमी करावेत. केस कापताना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • बोटांची नखं कापलेली असावीत. वाढलेली नखं, त्याच्यात साठलेली घाण बघून जोडीदाराला किळस वाटू शकते.
  • संभोगाच्या आधी लघवीला ( व गुदमैथुन करणार असाल तर संडासला) जाऊन यावं.संभोग झाल्यावर लघवीला जाऊन यावं.
  • पुरुषावर मुखमैथुन होणार असेल तर लिंग स्वच्छ असावं, शिस्नमुंडावर 'स्मेग्मा' नसावा.
  • काही स्त्रिया लिंग-योनीमैथुन झाल्यावर योनीच्या आत पाणी घालून योनी धुतात (डुचिंग). त्यांचा समज असतो की असं केल्याने पुरुषबीजं धुऊन जातील व गर्भधारणा होणार नाही. हा समज चुकीचा आहे. योनी आतून धुऊन गर्भधारणा होणार नाही याची खात्री देता येत नाही. काही स्त्रिया असुरक्षित संभोग करतात व एचआयव्हीची लागण होऊ नये म्हणून संभोगानंतर 'डुचिंग' करतात. योनी आतून धूऊन एचआयव्हीची लागण टाळता येत नाही. योनी आतून धुऊन योनीच्या आतील जिवाणूंचं संतुलन बिघडतं. पाणी अशुद्ध असेल, हात स्वच्छ नसेल तर विविध जिवाणू, किटाणू योनीत जाऊन इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून योनी आतून धुऊ नये.
७४

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख