पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोणावर अन्याय होत नाही. स्वप्नरंजन तुमच्या इच्छेला वाचा फोडते आणि तरीसुद्धा ती इच्छा तुमच्या स्वप्नविश्वातच बंदिस्त असते.

हस्तमैथुन

 बहुतेकजणांचा लैंगिक सुख अनुभवण्याचा पहिला मार्ग हा हस्तमैथुन असतो. प्रयोग करून किंवा मित्रांकडून शिकून मुलं हस्तमैथुन करायला लागतात. मित्रांकडून शिकलं तर त्या वरदाना' बरोबर हस्तमैथुनाचे अनेक दुष्परिणाम आहेत ही चुकीची माहिती 'शाप' म्हणून बरोबर येते आणि म्हणून प्रत्येक लैंगिक शिक्षणाच्या सत्रात (आणि अनेक वेळा हेल्पलाईनवर) “हस्तमैथुनानं काही अपाय होतो का?" हा प्रश्न कानी पडतो.

 हस्तमैथुन म्हणजे आपल्या हातानं आपल्या जननेंद्रियांना स्पर्श करून स्वतःला लैंगिक सुख देणं. हस्तमैथुनासाठी काही पर्यायी शब्द वापरले जातात-'६१-६२', 'हंड पंप', 'मुष्ठीमैथुन', मूठल्या मारणं इत्यादी. लैंगिक इच्छा उत्पन्न झाली की पुरुष उत्तेजित लिंग मुठीत धरून मूठ पुढे मागे करून लैंगिक सुख घेतो. योनी उपलब्ध नाही म्हणून या कृतीत योनीच्या जागी मुठीचा वापर केला जातो. बहुतांशी पुरुष व काही स्त्रिया हस्तमैथुन करतात. माझ्या कार्यशाळेत मला असं दिसून आलंय की थोड्याच स्त्रियांना, स्त्रियांच्या हस्तमैथुनाबद्दल माहिती असते. स्त्रिया आपल्या शिस्निकेला स्पर्श करून किंवा बोट योनीत घालून हस्तमैथुन करतात. काळजी घ्यायची की बोट स्वच्छ असावं व बोटाचं नख वाढलेलं नसावं. बोटाच्या ऐवजी काहीजणी एखादया टोकदार नसलेल्या स्वच्छ वस्तूचा लिंगासारखा उपयोग करतात. काळजी घ्यायची, की वस्तू टोकदार नसावी, मोडणारी नसावी, नाहीतर इजा होऊ शकते. तसेच वस्तू पूर्णपणे योनीत आत घालू नये.

 हस्तमैथुनाबद्दल बहुतेक पुरुषांमध्ये गैरसमज व भीती दिसते. हस्तमैथुन करून लिंग वाकडं होतं, दमा होतो, नपुंसकत्व येतं, 'वीर्याचा एक थेंब ४० थेंब रक्तातून बनलेला असतो' म्हणून ते गमावल्यावर थकवा येतो, असे असंख्य गैरसमज मनात असतात. बहुतांशी पुरुषांनी हस्तमैथुन केलेलं असल्यामुळे आता आपल्या पुढच्या लैंगिक जीवनात याच्यामुळे अडचण येणार ही मनात धास्ती असते. पुढे काही लैंगिक प्रश्न उपस्थित झाला (उदा. मूल होत नसेल इत्यादी) तर हा आपण हस्तमैथुन केल्याचा परिणाम आहे असा चुकीचा समज होतो. हस्तमैथुनानं अपाय होतो ही चुकीची माहिती अनेक तंबू ठोकून जडीबुटी विकणारे व काही डॉक्टर्सही पसरवतात.

 हस्तमैथुनाचे अनेक फायदे आहेत. हस्तमैथुन करायला जोडीदाराची जरूर नसते. केव्हाही एकांतात तो करता येतो. त्याने एसटीआय/एचआयव्ही/एड्स किंवा

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

७३