पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काय अर्थ लावतो म्हणून शरीर लैंगिक प्रतिसाद देतं? हे शास्त्राला अजून माहीत नाही. थोडी जाण आहे, ती लैंगिक उत्तेजनेच्या यंत्रणेची. ज्या गोष्टी मानसिक स्वास्थ्य बिघडवतात त्या गोष्टी लैंगिक सुखासाठी मारक असतात. अपराधीपणा, भीती, काळजी, वेदना, दुःख, आजार, नशा हे घटक लैंगिक सुखात बाधा आणतात. ज्या गोष्टी मानसिक स्वास्थ्याला पूरक आहेत, त्या त्या गोष्टी लैंगिक सुखास पूरक असतात. लैंगिक ज्ञान, चांगला संवाद, निवांत वेळ व कल्पकता या सर्व गोष्टी लैंगिक सुखास पूरक ठरतात.

लैंगिक सुखास मारक घटक

अपराधीपणा

 लैंगिक सुखात सर्वांत मोठी अडचण आणणारा घटक आहे तो म्हणजे अपराधीपणा, स्वप्नरंजन असू देत किंवा एखादी लैंगिक कृत्ती असू देत त्याच्याबद्दल जर मनात अपराधीपणाची भावना असेल, तर त्याचा लैंगिक अनुभवावर विपरीत परिणाम होतो. अपराधीपणा काही गैरसमजुर्तीतून येतो तर काही वेळा सांस्कृतिक नियंत्रणातून येतो. हस्तमैथुन करावासा वाटतो पण, 'ते करणं चांगलं नाही', अशी शिकवण मिळाली तर अपराधीपणाची भावना येते. 'आता बास! हे शेवटचं, याच्यापुढे मी दोन महिने लिंगाला हात लावणार नाही.' ही प्रतिज्ञा दोन दिवसांत मोडली जाते व आपण किती दुर्बळ आहोत म्हणून स्वतःला कोसलं जातं. काहीजणांना स्वप्नरंजनाबद्दल अपराधीपणा वाटतो. एकजणाने मला विचारलं, “मला माझ्या एका जवळच्या नातेवाइकाबरोबर संभोग करण्याचं स्वप्नरंजन करायला आवडतं. मी वास्तवात तसा संभोग करू शकणार नाही. पण निदान कल्पना मनात आणून हस्तमैथुन करून ती इच्छा काही अंशी पुरी करतो. हे चुकीचं नाही ना? म्हणजे पापबिप नाही ना?" काहींना विशिष्ट संभोग किंवा पोझिशनचा अपराधीपणा वाटतो. एकजण म्हणाला, "मला जोडीदाराबरोबर 'डॉगी स्टाइलनी करायला आवडतं. अशा घाण घाण पोझिशनमध्ये मला सेक्स का करावासा वाटतो?" अशी असंख्य कारणं आहेत, जिथे अपराधीपणा लैंगिक सुखास मारक तर ठरतोच पण त्याचबरोबर त्याचा आपल्या स्व- -प्रतिमेवर विपरीत परिणाम होतो. आपली जोडीदाराकडे बघण्याची दृष्टी दूषित करतो. एखादी हवीहवीशी वाटणारी पण आपण घाण मानत असलेली गोष्ट करत असलो तर त्यामुळे स्वत:बद्दल व जोडीदाराबद्दल द्वेष उत्पन्न होतो. यातून स्वतःला शिक्षा करून प्रायश्चित्त घेण्याचे विचार येऊ लागतात. आपल्या लैंगिक गरजांना, आवडीला जोडीदार जबाबदार आहे असं मानून त्याला / तिला वाईट वागणूक देणं, मारहाणं करणं अशा अनेक रूपात हा अपराधीपणा प्रकट होतो.

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

६८