पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लैंगिक अनुभव




 दृष्टी, स्पर्श, वास, आवाज व चव या पाच माध्यमांतून आपल्याला आजूबाजूचे संदेश मिळत असतात. डोळे, त्वचा, नाक, कान, जीभ या प्रत्येकामध्ये विशिष्ट प्रकारच्या पेशी असतात. डोळ्यांच्या पेशीमधल्या रसायनांना रंगातील बदल कळतो. नाकाच्या पेशींना हवेतील विविध रसायनांचा बदल कळतो. त्वचेतील पेशींना दाबाचा बदल कळतो. आवाजाच्या लहरींमुळे कानाच्या पडदयाच्या हलण्यानं आवाजाचा संदेश कळतो. जिभेतील विशिष्ट पेशींना चवीचा बदल कळतो. यांचे संदेश आपल्या मेंदूत जातात. या संदेशांना अर्थ लावण्याचे काम मेंदू करतो आणि त्याप्रमाणे प्रतिसाद देतो. उदा. जर प्रेयसीनं लैंगिक जवळीक साधण्यासाठी प्रियकराच्या मांडीवर हात ठेवला, तर प्रियकराची दृष्टी व स्पर्शाचे संदेश मेंदूकडे जातात. मेंदू या संदेशांचा अर्थ लावतो, की प्रेयसीला जवळीक हवी आहे. जर मूड चांगला असेल तर मेंदू या संदेशांना प्रतिसाद म्हणून विशिष्ट संदेश पाठवतो ज्याच्यामुळे लैंगिक उत्तेजना येते. अशा वेळी जर अचानक दाराची घंटा वाजली तर मेंदूची स्थिती झदिशी बदलते. दाराची घंटा वाजल्यावर एकीकडे लैंगिक संदेश मिळत असतात व त्याचबरोबर लैंगिक उत्तेजना घालवणारे संदेशही मिळत असतात. या परस्परविरोधी संदेशांची चढाओढ होते. लक्ष विचलित झाल्यामुळे लैंगिक उत्तेजना जाते.

 लैंगिक इच्छा, उत्तेजना या दोन्ही मेंदूतून नियंत्रित होतात. लैंगिक सुखाची शारीरिक व भावनिक अनुभूतीही मेंदू करतो. प्रत्येकाच्या मेंदूची घडण वेगळी असल्यामुळे प्रत्येकाचा लैंगिक अनुभव हा स्वतंत्र असतो. संभोगातून कोणाला किती लैंगिक सुख मिळतं याची तुलना करता येत नाही. संभोगाचा प्रकार असो, संभोगाची पोझिशन असो, संभोगाचा कालावधी असो, भिन्नलिंगी किंवा समलिंगी संभोग असो या कोणत्याच पैलूंची एकमेकांशी तुलना करता येत नाही. प्रत्येकाची लैंगिक अनुभूती स्वतंत्र असल्यामुळे कोणतीही कृती श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरवता येत नाही. म्हणूनच संभोग हा दोन पायांमध्ये नसून तो दोन कानांमध्ये आहे असं म्हटलं जातं. लैंगिक सुखाची इच्छा होणे म्हणजे नेमकं काय? विविध संदेशांचा मेंदू कसा व


मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

६७