पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भीती

 दुसरा महत्त्वाचा लैंगिक सुखास मारक घटक आहे तो म्हणजे भीती. भीती काही वेळा अज्ञानातून येते. जर स्त्रीला संभोगाच्या वेळी काय होणार हे माहीत नसेल तर संभोगाचा अनुभव घ्यायच्या वेळी भीती वाटते. काही वेळा भीती अनुभवातून येते. एखादया स्त्रीवर बलात्कार झाला असेल तर या प्रसंगानंतर तिला आपल्या जोडीदाराबरोबर लैंगिक जवळीक साधायची भीती वाटू शकते.

काळजी

 जर कौटुंबिक, व्यावसायिक काळज्या असतील तर त्याचाही प्रभाव लैंगिक अनुभवावर पडतो. लैंगिक उत्तेजना कमी होणं, संभोग करताना मध्येच उत्तेजना जाणं असे परिणाम दिसू शकतात.

 जर घर छोटं असेल व इतरजणं घरात राहत असतील तर घरातल्या इतरजणांना आपल्या संभोगाची जाण होईल म्हणून कोणताही आवाज न करता दडपणाखाली संभोग करावा लागतो. याच्यामुळे लैंगिक सुखास बाधा येते.

 काही वेळा गैरसमजातून काळजी निर्माण होते व त्यामुळे लैंगिक सुखास अडचण येते. एक ताई म्हणाल्या, “मला मुखमैथुन करायला आवडतं पण मला सारखी भीती असते की त्यानं गर्भधारणा होईल.

दुःख व वेदना

 आपल्या जवळची व्यक्ती दगावली तर काही काळ काहीजणांना लैंगिक इच्छा होत नाही, तर काहींना ते दुःख दूर करण्यासाठी तळमळीची लैंगिक इच्छा होते व त्याचं अपराधीपण वाटतं. 'ही जाऊन दोन महिनेसुद्धा नाही झाले तर मला लैंगिक इच्छा होऊ लागली. म्हणजे मी तिच्याशी प्रतारणा करतोय', किंवा 'मला ती जाण्याचं पुरेसं दुःख झालं नाही' अशी मनात भावना येते. याच्यामुळे पुरेशी उत्तेजना नयेणं, संभोगात मध्येच उत्तेजना जाणं, इत्यादी परिणाम दिसतात.


आजार/औषधं

विविध आजार, त्यांच्यावर घेतलेले उपचार, दारू/नशा लैंगिक अनुभवावर प्रभाव पाडतात.

लैंगिक सुखास पूरक घटक

 आपला लैंगिक अनुभव सुखकारक असावा यासाठी पूरक असलेले चार महत्त्वाचे घटक - लैंगिक ज्ञान, संवाद, निवांत वेळ व कल्पकता.


मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

६९