पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोणा व्यक्तींबरोबर असुरक्षित संभोग झाला व ती व्यक्ती एसटीआय/एचआयव्ही संसर्गित असेल तर त्याच्या/तिच्यापासून एसटीआय/एचआयव्हीची लागण होऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इतर कुणा व्यक्तीशी जवळीक साधल्यावर त्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी आपला बांधीलकीचा जोडीदार व आयुष्यात नवीन आलेली व्यक्ती या दोघांबद्दल भावनिक जवळीक निर्माण झाल्यामुळे ओढाताण होऊ शकते. बांधीलकीच्या जोडीदाराबरोबर असलेल्या नात्यावर ताण पडू शकतो. मला एकजण म्हणाला, “म्हणून इतर व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवताना, जर भावनिकदृष्ट्या त्या व्यक्तीबद्दल जवळीक जाणवायला लागली की मी लगेच ते नातं संपवतो. आपल्या घरच्या जोडीदाराला प्राधान्य देतो."


बांधीलकी नसलेली 'ओपन' नाती

 या नात्यात जोडीदारांची एकमेकांस कोणतीही बांधीलकी नसते. ते आर्थिकदृष्ट्या किंवा इतर कारणांसाठी एकत्र राहात असतात. गरजेनुसार ते जवळ येतात व दूर जातात. अशा नात्यातही जर इतर कोणा व्यक्तीबरोबर असुरक्षित संभोग झाला व ती व्यक्ती एसटीआय/एचआयव्ही संसर्गित असेल तर त्या व्यक्तीपासून एसटीआय/एचआयव्हीची लागण होऊ शकते. या नात्यात कालांतरानं एकाला जोडीदाराबद्दल प्रेम निर्माण झालं तर त्या एकतर्फी प्रेमामुळे त्रास होऊ शकतो. माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीचं असं नातं होतं. सुरुवातीला दोघांची एकमेकांशी काहीही बांधीलकी नव्हती. कालांतरानं स्त्रीनं ते नातं कायम करायची इच्छा व्यक्त केली. पुरुषाला ते मंजूर नव्हतं, म्हणून मग तिला त्याला सोडून दयावं लागलं.


६६

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख