पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बहुतेकांनी सुरुवातीलाच आपले नाव 'कोट्स'ना दिले जाऊ नये अशी अट घातली होती. ती अट अर्थातच मला मान्य होती. मुलाखती घेताना जाणवले, की काहींना किती मोकळेपणाने बोलावे हा अंदाज येत नव्हता. ज्यांच्या एकापेक्षा जास्त मुलाखती झाल्या त्यांच्याशी बोलताना जाणवले की जसजशी ओळख वाढत गेली तसतसे ते काही अत्यंत खाजगी गोष्टी सांगू लागले. पण सांगताना, “ही गोष्ट माझ्या नावानं देऊ नका," असे बजावून सांगत होते. या अशा काही गोष्टी 'कोट्स'मध्ये आल्या नाहीत, पण माहितीच्या रूपाने वेगवेगळ्या अंगातून मांडण्याचा मी प्रयास केला आहे.

 काहींच्या बाबतीत मुलाखती घेताना माझ्या आणि त्यांच्या लक्षात आले, की त्यांना मुलाखत देण्याचा उत्साह होता, पण मी विचारत असलेल्या अनेक प्रश्नांचा त्यांनी कधीही विचारच केला नव्हता. 'असा कधी विचारच केला नाही" ही उत्तरंही बरेच काही सांगून जात होती. (आणि याच अनुषंगाने त्यांच्यासमोर चार नवीन प्रश्न येत होते.)

 काहींना भाषेची अडचण आली. मराठीत लैंगिकतेशी निगडित फार कमी शब्द आहेत. लैंगिकता हा 'टॅबू' असल्यामुळे या बाबतीत मराठी बोली भाषेचा पुरेसा विकासच झाला नाही असे मला वाटते. काही शब्द इतके अपरिचित आहेत की ते वापरले तर कोणालाच त्याचा अर्थ कळणार नाही अशी गत. इंग्रजी शब्दांचा आधार घेऊन प्रश्न विचारले, तर इंग्रजी येत नसल्यामुळे किंवा मर्यादित येत असल्यामुळे काहींना माझे प्रश्न समजण्यास अडचण होत होती. मी वर्णन करून शब्दांचा अर्थ समजावयाला लागलो की काहीजण गोरेमोरे व्हायचे, काहीच बोलायचे नाहीत, नजर चुकवायचे. भाषेबद्दल डॉ. हेमंत आपटे म्हणाले, "लैंगिकतेचा अभ्यास करताना अनेक वेळा अडचण येते. मीच केलेल्या एका सर्वेक्षणाचा अनुभव सांगतो. गुप्तरोगाबद्दल तरुणांना काय माहीत आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो. हे करताना लक्षात आलं, की काहींना गुप्तरोग म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. त्यांनी हा शब्द कधी ऐकलाच नव्हता. तर काहींनी त्याचा वेगळाच अर्थ काढला होता. मी जेव्हा एका मुलीला विचारलं तेव्हा ती म्हणाली, की "गुप्तरोग म्हणजे ज्या रोगाबद्दल गुप्तता पाळली जाते. उदा. कुष्ठरोग,

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख