पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 हे पुस्तक लिहिताना मी मुख्यतः लमाणाची भूमिका घेतली आहे. हे पुस्तक मी मागच्या काही वर्षांत घेतलेल्या लैंगिकतेच्या कार्यशाळा, हेल्पलाईन व 'बीफ्रेंडींग'चा अनुभव, माझी लैंगिकतेच्या विषयातील जाण, विविध विषयांत प्राविण्य मिळवलेले डॉक्टर्स, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते व विविध प्रश्नांना सामोरे गेलेले क्लायंट' या सगळ्यांच्या योगदानातून साकार झालेले आहे.

 मला वाटले की पुस्तक हे फक्त माहितीवर आधारित नसावे, पुस्तकात लोकांचे या विषयातील अनुभव असावेत, म्हणून यात काही डॉक्टर्स, मानसोपचारतज्ज्ञ व विविध क्लायंटचे कोट्स' आहेत.

 मुलाखतदार शोधायच्यावेळी काहींकडून असे आले, की “जो विषय आम्ही आमच्या जवळच्यांशी आजवर बोलू शकलो नाही तो विषय तुझ्यासारख्या तिन्हाईतासमोर कसा मांडायचा? तुझ्यासाठी आम्ही जखमा का परत उघडायच्या?" याविषयाबद्दल असलेल्या लज्जेमुळे अनेकजणांनी मुलाखती देण्यास नकार दिला. जर या लोकांकडून जास्त सहकार्य मिळाले असते, तर हे पुस्तक नक्कीच जास्त अनुभवांनी संपन्न झाले असते.

 अनेकजणांनी मला इंटरनेटचा आधार घेऊन पाश्चात्त्य माहिती गोळा करण्यास सुचवले. जरी माहिती इंटरनेटवर उपलब्ध असली, तरी त्यात आपल्या संस्कृतीशी निगडित असलेले दृष्टिकोन, समस्या कळणे अवघड होते, म्हणून नुसती इंटरनेटवरची माहिती वापरून पुस्तक लिहायचे टाळले. माहिती समजून घेण्यासाठी मात्र इंटरनेटचा खूप उपयोग झाला.

 मुलाखती घेताना मी 'अनस्ट्रक्चर्ड फॉर्म' वापरला. जिथे शक्य आहे तिथे 'क्लायंट'ना दोन मुलाखतींची 'कमिटमेंट' मागितली. (यामुळे पहिल्या मुलाखतीवर नंतर विचार करताना जर नवीन काही प्रश्न सुचले, तर ते परत त्यांना विचारता आले.) पण हे सर्वांच्या बाबतीत जमले नाही. (विशेषत: ज्यांनी नाव, पत्ता न देता मुलाखती दिल्या किंवा ज्यांनी अनुभव लिहून दिले.) पुस्तक छापण्यापूर्वी, जिथे शक्य आहे तिथे पुस्तकातील कोट्स' ज्या त्या व्यक्तीकडून तपासून घेतले. त्यांनी सुचवलेले बदल केले.

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख