पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

क्षयरोग इत्यादी." मराठी भाषेच्या मर्यादेमुळे पुस्तक लिहिताना इंग्रजी शब्दांचा वापर जास्त झाला आहे याची मला जाणीव आहे. हळूहळू हेच इंग्रजी शब्द मराठीचा भाग बनतील, अशी आशा करतो.

 काहींनी मुलाखती दयायची किंवा लिहून देण्याची तयारी दाखवली, पण हे काम मनावर घेतले नाही. (किंवा पहिल्यांदा "हो" म्हणून कदाचित त्यांना नंतर मुलाखत दयावीशी वाटली नाही). टाळमटाळ करणे, अनुभव लिहून पाठवायला वारंवार आठवण करून देऊनसुद्धा न देणे अशी अनेक उदाहरणे समोर आली. त्यामुळे वाट बघण्यातही बराच वेळ गेला.

 काहींची माझ्याशी बोलायची तयारी नव्हती, पण माझा व त्यांचा विश्वास असलेल्या एका तिसऱ्या व्यक्तीबरोबर बोलायची तयारी होती. अशा वेळी मध्यस्थीने मी अनुभव मिळवले.

  काहींनी अगदी मोकळेपणाने माझ्याशी या विषयावर संवाद साधला. स्वत:चे लैंगिक पैलू माझ्यासमोर न लाजता मांडले. त्यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडे. एकजण म्हणाल्या, “आपल्या आयुष्यातला एवढा महत्त्वाचा पैलू बहुतेकजण मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. त्याच्याबद्दल बहुतेकजण आपल्या जोडीदाराशीसुद्धा बोलत नाहीत. अशा वातावरणात शारीरिक व मानसिक आरोग्य किती चांगलं असणार?"

 या पुस्तकात सर्वेक्षणांच्या टक्केवारीचा वापर नगण्य आहे. याला अनेक कारणं आहेत. एकतर लैंगिकतेवरची फार सर्वेक्षणं झालेली नाहीत. जी झाली आहेत त्यांच्यातल्या अनेकांना मर्यादा आहेत. काहींमध्ये पुरेसा सँपल साईज' नाही, तर काही सर्वेक्षणं समाजाचं प्रतिनिधित्व करू शकतीलच असं नाही. डॉ. हेमंत आपटेंनी १९९० मध्ये 'डेबोनेअर' मासिकात लैंगिकतेवर केलेल्या सर्वेक्षणाचे उदाहरण दिलं. ते म्हणाले, "डेबोनेअर' हे 'इलिटीस्ट' मासिक आहे. त्याच्या प्रश्नावलीला उत्तर देणारे, सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करणारे असू शकत नाहीत. म्हणजे या सर्वेक्षणातून मिळालेली टक्केवारी सगळ्या लोकसंख्येला लावणं बरोबर होणार नाही." काही सर्वेक्षणांमध्ये मेथॉडॉलॉजीत दोष आढळतात. 'शोधना'


मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख