पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या सर्व पैलूंची जाण यावी व आपण कुठे तडजोड करू शकतो, कुठे करू शकत नाही, याची समज यावी म्हणून वाढत्या प्रमाणात जोडीदार काही काळ बिनलग्नाचे एकत्र राहू लागले आहेत. या नात्यांना 'लिव्ह इन' नाती म्हणतात. काही काळ असं राहून मग लग्न करायचं की नाही, हा निर्णय घेतला जातो.

'लिव्ह इन' नाती

 मोठ्या शहरात 'लिव्ह इन' नाती वाढत्या प्रमाणात दिसू लागली आहेत. माझ्या मते हे एक चांगलं पाऊल आहे. दोघांना दीर्घकाळ एकत्र राहणं जमणार आहे का नाही? हे लग्न करायच्या अगोदर कळणं महत्त्वाचं आहे. अंदाजे ३-४ वर्षांत हे नातं ठेवायचं की संपवायचं याचा अंदाज येतो. या नात्यात सर्वांत महत्वाचा भाग असतो तो म्हणजे, चांगल्या दर्जाचा संवाद. कायदा, धर्म, संस्कृती यांच्यावर हे नातं उभं राहिलेलं नसतं. जोडप्याच्या सामंजस्यावरच हे नातं उभं राहतं. हा 'ट्रायल पीरियड' असल्यामुळे या काळात मूल होऊ देऊ नये.

 या नात्यात जर काही वर्षांनंतर दोघं वेगळे झाले व जर स्त्री जोडीदार आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर ती रस्त्यावर येऊ शकते. पुढे पुरुषाला दुसरी जोडीदार मिळण्यास फारशी अडचण येत नाही. पण स्त्रीला मात्र दुसरा जोडीदार मिळायला खूप अडचण येऊ शकते. त्यामुळे 'लिव्ह इन' नात्यामध्येही स्त्रीला जास्त किंमत मोजायला लागायची शक्यता असते.

'क्लोज्ड' व 'ओपन' नाती

 एका जोडीदाराबरोबर लैंगिक नातं असताना दुसऱ्या एखादया व्यक्तीबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित करायचे का? याच्याबद्दल जोडीदारांच्या एकमेकांपासून काय अपेक्षा आहेत?

'क्लोज्ड' नाती

 'क्लोज्ड' नाती म्हणजे त्या नात्यातील जोडीदारांना इतर कोणाबरोबरही लैंगिक सुख घेण्याची परवानगी नसते. म्हणजे एका व्यक्तीचा एकच लैंगिक जोडीदार. याला 'मोनोगॅमी' म्हणतात. हिंदू व ख्रिस्ती धर्मात 'मोनोगॅमी' हा विवाहसंस्थेचा पाया मानला जातो. अनेक 'लिव्ह इन' नात्यातसुद्धा मोनोगॅमी' हा पाया असतो.

 एकापेक्षा जास्त जोडीदार असतील व त्या नात्याला सामाजिक मान्यता असेल तर अशा नात्याला 'पॉलिगॅमी' म्हणतात. 'पॉलिगॅमी' चे तीन प्रकार आहेत. 'पॉलिजीनी', 'पॉलीअँड्री', 'ग्रुप मेरेज'. भारतात मुस्लिम धर्मात पुरुषांना एकाच वेळी कायदयाने जास्तीत जास्त चार बायका करता येतात. एका पुरुषाला


६४

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख