पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तशी संधी मिळाल्यास दोघांचा त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन.).

  • नोकरी/व्यवसाय (सध्याचं उदरनिर्वाहाचं साधन, स्त्रीला नोकरी/व्यवसाय

करण्याची मुभा, स्त्रीला स्वतंत्र आर्थिक व्यवहार/बचत करायची मुभा).

  • मानसिक व शारीरिक आरोग्य (महत्त्वाची मानसिक, शारीरिक आरोग्याची

माहिती जोडीदाराला स्पष्टपणे सांगणं.).

  • लैंगिक नात्यांचा प्रकार (क्लोज/ओपन).
  • लग्नाची पद्धत व विवाहसंदर्भातील कायदे (विवाह 'द स्पेशल मॅरेज अॅक्ट,'

१९५४ खाली करायचा की विशिष्ट धर्माच्या कायद्यानुसार? प्रत्येक पर्यायाचे फायदे, तोटे नीट समजून घ्यावेत व मग निर्णय घ्यावा. (विशेष टिपणी - क्वचित वेळा अगदी जवळच्या नात्यात लैंगिक जवळीक साधली जाते. काही वेळा प्रेम असतं तर काहीवेळा फक्त लैंगिक सुखासाठी ते जवळीक साधातात. अशा काही लैंगिक नात्यांना समाजमान्यता नाही. ज्या नातलगांमध्ये लग्न लागू शकत नाही, अशा नात्यांची यादी 'द स्पेशल मॅरेज अॅक्ट' मध्ये दिली आहे.).

  • लैंगिक ज्ञान.
  • कुटुंब नियोजन

पालकत्व

 मुलं हवी का नको? किती हवी? मुलं वाढवण्याची मानसिक तयारी आहे का? काही जोडप्यांना मूल नको असतं. तर काहींना मूल हवं असतं. शहरात अनेक उदाहरणं दिसतात की ज्यांची लग्न झालेली आहेत पण ज्यांना मूल नको आहे. मूल नसलं तर ते नातं टिकणार नाही किंवा मूल नसलं तर ते नातं अपुरं आहे, ही समाजाची धारणा सरसकट सगळ्यांना लागू होत नाही. सर्वप्रथम जाणून घेतलं पाहिजे की सगळ्या स्त्रियांना व सगळ्या पुरुषांना मुलं हवी असतातच असं नाही. काही स्त्रिया/पुरुषांना मुलं खूप आवडतात, तर काहींना मुलं अजिबात आवडत नाहीत. त्यांना मुलं वाढवण्याची जबाबदारी घ्यायची इच्छा नसते. म्हणून सासू- सासऱ्यांच्या, समाजाच्या दबावाला बळी न पडता जोडप्यांनी स्वतंत्र विचार करून याबाबत निर्णय घ्यावा. जरी मूल हवं असेल तरी शक्यतो पहिली ३ वर्ष मूल होऊ देऊ नये. या काळात दोघांना एकमेकांना समजून घ्यायला, संसार स्थिरावयाला वेळ मिळतो. लक्षात ठेवा, दोघांचं अजिबात जमत नसेल, तर एखादं मूलं झालं की सगळ ठीक होईल' हा गैरसमज अजिबात बाळगू नका. अशाने परिस्थिती अजूनच बिघडू शकते. विभक्त होण्यासाठी वा घटस्फोट घेण्यास अजूनच अडचणी निर्माण होतात.

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

६३