पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाला, तर पुढे येणाऱ्या दिवसांची अगोदर कल्पना येऊ शकते व तशी मनाची तयारी करायला वेळ मिळतो.

  काही वेळा स्त्रीला गर्भधारणा झाली, की "ते मूल माझं नाहीच' असं म्हणून पुरुष जबाबदारी टाळतो, पळून जातो. तर काही वेळा जोडीदारापासून एसटीआय/ एचआयव्हीची लागण होते. आपल्याला सुरक्षित संभोग करण्याची आवश्यकता का आहे, आपल्या नात्यातील आपली जबाबदारी काय आहे, याचा गंधही बहुतेक वेळा दोघांना उमगलेला नसतो. नीट विचार न करता व संवाद न साधता बनलेल्या नात्याचे परिणाम जास्त प्रमाणात स्त्रीला भोगावे लागतात. आपण प्रौढ होणं म्हणजे लैंगिक नात्याच्या बरोबर येणाऱ्या जबाबदारीचा स्वीकार करणं ही मूलभूत जाण बहुतेक प्रेमी युगुलांमध्ये नसते. प्रेमात असल्यामुळे वास्तवाचं भान नसतं. नात्यात ते वास्तव आणण्यासाठी लैंगिक नात्यांवर कॉन्सेलिंग करणाऱ्या संस्थांचा आधार जरूर घ्यावा. प्रेमी युगुलांनी कॉन्सेलरला भेटणं, त्यांच्या मानसिक व लैंगिक आरोग्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं.

विवाहसंस्था

 "खरं तर माझा लग्ना-बिग्नावर विश्वास नाही पण करावं लागलं,” अशी सुरुवात करून अनेक पुरुष लग्नाला नाही म्हणायचा पुरुषार्थ का दाखवू शकलो नाही म्हणून रडगाणी गातात. ते लग्न करून पस्तावले असा त्यांचा स्वर असतो. काहींना मुलाबाळांची जबाबदारी नको असते तर काहींच बायकोशी अजिबात पटत नाही. अनेकजण, बायकोला कमी लैंगिक इच्छा आहे म्हणून कुचंबणा होते ही तक्रार सांगतात.

  समाजानं प्रत्येकासाठी विवाहसंस्था काढलेली असली तरी प्रत्येक व्यक्तीसाठी विवाह हे उत्तर असू शकत नाही. प्रत्येकाचा स्वभाव, विचारसरणी स्वतंत्र आहे. सगळ्यांनाच विवाहातून येणारी बंधनं, जबाबदारी घ्यायला आवडते असं नाही. काहीजण संसारापेक्षा 'करिअर'ला जास्त प्राधान्य देतात. आपण संसार केला तर आपलं करिअरकडे दुर्लक्ष होईल, म्हणून काहीजण संसार करत नाहीत. तर काहींना संसार, मुलंबाळं हवी असतात. नोकरी, व्यवसाय हा अर्थार्जनासाठी असला तरी संसारालाही तितकंच किंवा त्याहून जास्त प्राधान्य दिलं जातं. म्हणून कोणत्या प्रकारची लैंगिक जीवनशैली जगायची, हे ज्याला/त्याला स्वतंत्रपणे ठरवू दयावं.

  विवाह केलाच पाहिजे या धार्मिक व सांस्कृतिक दडपणाखाली बहुतेकांना इच्छा असो वा नसो लग्न करावं लागतं. आजही बहुतांश वेळा पालकच मुला/मुलींची लग्न ठरवतात. ज्यांचं लग्न ठरतं त्यांच्या काय अपेक्षा आहेत याचा पालक विचार करत नाहीत. पुरुष व स्त्री यांच्यात लैंगिक आकर्षण असणारच व प्रेम हे लग्न


मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

६१