पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाहीत तर दुसरा जोडीदार निवडला जाईल' म्हणजे पालकत्व हाच नात्याचा प्रमुख उद्देश असणार आहे? का संभोगासाठी हक्काचा जोडीदार मिळावा/मिळावी हा त्या नात्याचा सर्वांत महत्त्वाचा पाया आहे? अशा सर्व गोष्टींचा दोन्ही जोडीदारांनी नीट विचार करणं व आपल्या जोडीदाराला स्पष्ट कल्पना देणं आवश्यक आहे. तसं न झाल्यास, दोघंही असमाधानी राहणार हे गृहीत धरा.

डेटिंग

  शाळा/कॉलेजमधील मुला/मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात डेटिंग होतं. पहिल्या प्रेमात सर्व जग गुलाबी दिसत असतं. जोडीदाराच्या सहवासाशिवाय एक सेकंदही राहवत नाही. या कालावधीत दोघंही अत्यंत भावूक असतात. छोट्या छोट्या गोष्टींबद्दल असुरक्षित वाटणं, चिडायला होणं, मत्सर वाटणं, दुःख होणं या अनुभवांशिवाय पहिलं प्रेम अनुभवताच येत नाही. जोडीदाराबरोबर फिरणं, संवाद साधणं, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांना समजून घेणं हे सर्व पैलू या नात्यात उतरतात.

  हळूहळू त्या नात्याचं लैंगिक प्रकटीकरण होऊ लागतं. मिठीत घेणं, चुंबन घेणं, लैंगिक स्पर्श करणं, काही वेळा कपडे अंगावर ठेवून अंग घासून 'बॉडी-सेक्स' करणं इत्यादी. कालांतराने मुखमैथुन, लिंग-योनीमैथुन किंवा गुदमैथुन होऊ शकतो. जर जोडीदारांनी या नात्याचा अर्थ, नात्याची पुढची दिशा, कुटुंब नियोजनाची साधनं अशा लैंगिक विषयांवर मोकळेपणाने संवाद साधला नाही, तर हे सर्व होताना दोघेजण त्या नात्याकडे कोणत्या नजरेनं बघताहेत हे कळायला मार्ग नसतो. अनेक वेळा महत्त्वाच्या गोष्टी गृहीत धरल्या जातात. 'मी त्याच्याबरोबर संभोग केला कारण आम्ही २ वर्ष फिरत होतो. आज ना उदया तो माझ्याशी लग्न करणार हे मी गृहीत धरलं होतं. आता तो लग्नाला नाही म्हणाला. त्याने माझी फसवणूक केली.' किंवा 'इतकी वर्षं आम्ही एकत्र काढली. आता त्याच्या घरचे माझी जात वेगळी म्हणून आमच्या लग्नाला मान्यता देईनात, म्हणून त्याने मला सोडून दिलं.' किंवा 'त्याला सेक्स हवा होता म्हणून जवळ आला, प्रेमाचं ढोंग केलं, एकदा ते मिळालं की त्यानं मला सोडून दिलं.' अशा हकिकती अनेक वेळा कानी येतात. कार्यशाळेत एकदा समोर आलं, की "आपण लग्न करणारच आहोत तर संभोग करायला काय हरकत आहे?” असा पुरुषानं आग्रह धरला. गर्लफ्रेंडबरोबर संभोग केल्यावर मात्र "तू जर माझ्याशी लग्नाअगोदर संभोग करतेस तर तू कोणाशीही करशील. अशी वाया गेलेली मुलगी मला बायको म्हणून नको," असं सांगून पाठ फिरवली. लग्नाआधीच त्या मुलीला आपल्या बॉयफ्रेंडचं खरं रूप दिसलं व ती लवकर त्याच्यापासून सुटली, असंच मी म्हणेन. अशा गोष्टींवर वेळेवर व स्पष्टपणे संवाद


६०

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख