पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्री आली की काही संन्याशांची तिच्याकडे बघण्याची नजर इतकी वखवखलेली असते, की तिला अस्वस्थ होतं. या असल्या ब्रह्मचर्याला काय अर्थ आहे? काहीजणांना नाईलाजानं ब्रह्मचर्याची अवस्था स्वीकारावी लागते. काहींना विविध आजारांमुळे किंवा विकलांगतेमुळे ब्रह्मचर्य वाट्याला येतं. काही कारणांनी स्त्री किंवा पुरुषाचं लग्न झालं नाही, तर आपल्या सनातनी संस्कृतीत त्यांना लग्न न करता लैंगिक जोडीदार मिळणं अवघडं असतं. लग्न न झालेल्यांना किंवा विधवा झालेल्यांना जोडीदाराची गरज भासते पण अशी नाती दिसली की समाज त्यांना (विशेषतः स्त्रीला) वाळीत टाकतो. समाजाच्या या असहिष्णू दृष्टिकोनामुळे अनेकजण इच्छा असूनसुद्धा लैंगिक जोडीदार शोधत नाहीत, जोडीदार मिळाला तरी जवळीक साधत नाहीत. अशा सनातनी वातावरणात सक्तीचं ब्रह्मचर्य वाट्याला येतं.

 आपल्याला माहीत आहे की लैंगिक सुखाशिवाय जगणं खूप अवघड आहे. मधूनअधून जोडीदाराच्या शरीराचा स्पर्श सर्वांना हवा असतो. एकटं असताना स्वतःला स्पर्श करून काही अंशी लैंगिक सुख घेता येतं, हस्तमैथुन करता येतो पण जोडीदाराबरोबर लैंगिकदृष्ट्या एकरूप होणं हा परिपूर्ण अनुभव असतो. तो न मिळाल्यामुळे मानसिक व शारीरिक उपासमार होतेः जसं खायला मिळालं नाही की पोटात आग पडते, काही सूचत नाही, कामात मन लागत नाही, त्याचप्रमाणे लैंगिक उपासमारीमुळे नैराश्य येतं, चिडचिडेपणा वाढतो, अंगी विक्षिप्तपणा येतो. असं झालं की, काहीजण इतर व्यक्तींना अनावश्यक स्पर्श करू लागतात. काहीजणांमध्ये बोलताना अश्लील शब्दांचं प्रमाण जास्त दिसतं. आजूबाजूच्या लोकांबद्दल (विशेषत: ज्या व्यक्ती आपल्याला लैंगिकदृष्ट्या आवडतात पण हाती लागत नाहीत) मत्सर वाटू लागतो. त्याचं परिवर्तन रागात किंवा सत्तेच्या गैर वापरात होऊ लागतं.

लैंगिक नाती

 कोणतंही लैंगिक नातं प्रस्थापित करताना त्या नात्याचं नेमकं काय उद्दिष्ट आहे याची जाण दोन्ही जोडीदारांना असणं अत्यावश्यक आहे. म्हणजे त्या नात्यातील दोघांच्या एकमेकांकडून काय अपेक्षा आहेत याच्यावर संवाद होणं गरजेचं आहे. दोघांना निखळपणे लैंगिक सुख हवयं म्हणून हे नातं 'कॅज्युअल' मानायचं का? दोघं दिर्घकाळ एकत्र राहण्याचा प्रयास करत आहेत का ? जोडीदाराने 'माझ्याबरोबर संभोग कर मग मी तुला नोकरी देईन' हे आमिष दाखवून लैंगिक संबंधाची मागणी केली आहे का ? का 'संभोगासाठी मी तुला इतके पैसे देईन' हा सौदा होतोय ? का 'मुलं हवीत म्हणून लग्न करतोय, जोडीदारामध्ये काही अडचणींमुळे मुलं झाली



मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

५९