पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आर्थिकदृष्ट्या पायावर उभं राहत नाही तोवर इतरांना तुमची लैंगिकता सांगायची घाई करू नका.'

 जेव्हा 'आऊट' व्हायचा निश्चय होतो तेव्हा काहीजण आपल्या जवळच्या मित्राला सांगतात. त्याची प्रतिक्रिया बघतात, पालकांना सांगायचं धाडस करायला खूप वेळ लागतो. अनेक दिवस कसं, कुठे, कधी सांगायचं याच्यावर विचार चालू असतो. भीती असते, दुःख असतं, काळजी असते. पुढे काय होणार ? घरच्यांच आपल्यावरचं प्रेम एका क्षणात विरणार का ? आणि तसं झालं तर मग घरच्यांचं प्रेम खरं होतं का ?

 नितीन कराणी म्हणाले, “मी समलिंगी विषयाची पुस्तकं माझ्या कपाटात ठेवली व मुद्दाम दार उघडं ठेवलं. आईला आज ना उदया ती दिसतील व तिला शंका येईल आणि हा विषय निघेल असा हेतू होता. तसंच झालं. आईनी पुस्तकं बघून वडिलांना सांगितलं व मग माझ्यापाशी हा विषय काढला."

 पालकांना सांगितल्यावर बहुतेकांना धक्का बसतो. फार थोड्यांच्या घरचे समजून घेतात. घरच्यांना भीती असते की इतरांना कळलं तर आपली इज्जत जाईल, काहींना याची किळस वाटते, सर्वांना दुःख होतं. काहीजणांना पालक घरातून बाहेर काढतात. आपल्याला घरच्यांनी स्वीकारावं अशी मुलाची खूप तळमळीची इच्छा असते पण जेव्हा मुलाला सर्वांत जास्त आधाराची गरज असते, तेव्हाच त्याला घरचे दूर करतात.

 ज्यांच्या घरचे समजून घेतात त्यांच्या घरच्यांना काळजी पडते की याचं पुढं कसं होणार? आपल्यानंतर याच्याकडे कोण बघणार? ही काळजी विशेषतः स्त्रियांबद्दल असते. एकटी स्त्री उघडपणे लेस्बियन म्हणून समाजात राहणार असेल, तर समाज तिला अनेक मार्गानं त्रास देणार ही भीती असते. आजूबाजूला एकट्या राहणाऱ्या स्त्रियांना समाज कशी वागणूक देतो हे त्यांनी आयुष्यभर पाहिलेलं असतं. गीता कुमाना म्हणाल्या, “आऊट झाल्यावर आपल्या वाटेत कायम अडचणी येणार हे माहीत असतं. आऊट होऊन इतकी वर्षं झाली तरी मला अजून घरच्यांनी पूर्णपणे स्वीकारलेलं नाही. आपल्याजवळचे आपल्यापासून दूर जातील याची मनाची तयारी करावी लागते. या सर्व अडचणी असूनसुद्धा मी आऊट झाल्याची मला अजिबात खंत नाही."

लैंगिक नातं

 एकटं आयुष्य जगणं मुश्कील आहे याची सगळ्यांनाच जाण आहे. आपली सुखदुःख वाटू शकू अशी आपली प्रेमाची व्यक्ती असावी असं प्रत्येकाला वाटतं. समलिंगी व्यक्तीही याला अपवाद नाहीत. काहीजण जोडीदाराचा शोध घेतात.

५४

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख