पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रतिकूल वातावरणात अशी व्यक्ती मिळणं अवघड असतं. बघून ती व्यक्ती समलिंगी आहे का नाही हे कळायला काहीही मार्ग नसतो. अशी व्यक्ती मिळाली तरी, ती आपल्या विचारसरणीशी जुळणारी असेलच असं सांगता येत नाही. विचार जुळले तरी एकत्र कसं राहणार? कसा संसार करणार? असे अनेक प्रश्न पडतात.

  जोडीदार मिळवायचा आणि मग ते नातं या प्रतिकूल वातावरणात टिकवता येत नाही म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचा याच्यापेक्षा असं नातं न शोधणंचं बरं, असाच विचार अनेकजण करतात. मग काय हाती उरतं? लैंगिक संबंधांसाठी जोडीदार शोधायचा व संबंध झाला की दूर व्हायचं.

  राहण्याची बहुतेकांची स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे, एकांत मिळण्यास अडचण येते. म्हणून या भेटीगाठी अंधाऱ्या ठिकाणी, झटपट होतात. अशा ठिकाणी निरोध उपलब्ध असतीलच असं नसतं, असले तरी लवकर आटपायचं या दडपणामुळे निरोध वापरायचं भान नसतं. अशामुळे एचआयव्हीसंसर्गित पुरुषापासून एचआयव्हीची लागण होण्याचा धोका असतो. अशा ठिकाणी गुंडांकडून तसंच पोलिसांकडून मारहाण होणं, लुबाडणूक होण्याची शक्यता असते.

  अशा प्रतिकूल परिस्थितीतही काहीजण जोडीदार मिळवतात व त्याच्याबरोबर संसार थाटतात. हे खेडेगावात करणं अवघड असलं तरी आता मोठ्या शहरात समलिंगी जोडपी एकत्र राहू लागली आहेत. आपल्यावर कोणाची वक्रदृष्टी पडू नये म्हणून ते प्रकाशझोतापासून दूर असतात.

  'समलिंगी समाज फक्त संभोगावर भर देतो, त्यांच्या नात्यात इतर भावनिक पैलू कुठे असतात ?' असा प्रश्न जेव्हा मला विचारला जातो तेव्हा मला प्रश्न विचारणाऱ्यांची कीव येते. ज्या समाजात समलिंगी नात्याचं लावलेलं रोपटं उपटायला सर्व समाज उतावीळ आहे, त्या रोपट्याला कुंपण घालायचा प्रयत्न वारंवार हाणून पाडला जातो, तिथं ते रोपटं जगणं किती अवघड आहे याचा संवेदनशीलपणे कोणी विचार केला का? समलिंगी नात्यातून मूल होणार नाही याची सर्वांना जाण असते पण म्हणून पुरुषानं पुरुष जोडीदाराबरोबर केलेला संभोग, त्याला दिलेलं प्रेम कमी दर्जाचं किंवा अपुरं होत नाही. ते भिन्नलिंगी नात्याइतकंच आनंददायी व परिपूर्ण असतं याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. इतरांना याची जाण कधी येणार?

समलिंगी लैंगिक संबंध

 लैंगिक नात्यात काही समलिंगी पुरुषांना दुसऱ्या पुरुषाबरोबर स्वीकृत (रिसेप्टिव्ह) भूमिका घ्यायला आवडते, तर काहींना 'इन्सर्टिव्ह' भूमिका घ्यायला आवडते. काहींना दोन्ही भूमिका घ्यायला आवडतात (व्हर्सटाईल). कोणाला



मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

५५