पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करायला लागते. स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला लागते. तिचं मन हळूहळू शांत व्हायला लागतं. निखळपणे समलिंगी प्रेमाचा अनुभव घेता येतो. अर्थात हे एका दिवसात होत नाही. कळत नकळत जसजसा आपल्या मनावरचा ताण कमी होतो तसे आयुष्याचे इतर रंग, पैलू समोर यायला लागतात.

 स्वतःचा स्वीकार झाल्यावर आपोआपच इच्छा होते की आपण जसे आहोत तशी उघडपणे आपली जीवनशैली जगली पाहिजे. समाजमान्यतेसाठी आपली लैंगिकता लपवून ठेवणं चुकीचं वाटतं. असं लपून राहण्याने गुदमरायला होतं आणि म्हणून मग ती समलिंगी व्यक्ती 'आऊट' व्हायचं ठरवते. म्हणजेच अभिमानानं आपण 'गे' (समलिंगी) आहोत हे जाहीर करायचं ठरवते.

 हा निर्णय अर्थातच सोपा नसतो. या निर्णयानं आपलं आयुष्य कायमचं बदलणार असतं. आपण समलिंगी आहोत हे सांगितलं की घरच्यांपासून दारच्यांपर्यंत सगळे आपले शत्रू बनतील याची जाण असते. घरचे बाहेर काढतील, नातेवाईक वाळीत टाकतील याची भीती असते. कामाच्या ठिकाणी आपण समलिंगी आहोत हे कळलं तर आपल्याला त्रास देतील याची काळजी असते. मालकाला जर कळलं की आपण समलिंगी आहोत तर आपल्याला भाड्यानं राहायला खोली कोणी देणार नाहीत, याची जाणीव असते. असं असून काहींना आपली लैंगिकता लपवायची इच्छा नसते. ते दुटप्पी आयुष्य जगण्यापेक्षा प्रामाणिकपणे आयुष्य जगणं पसंत करतात. हे धाडस कौतुकास्पद आहे.

 'कमिंग आऊट' ला मराठीत शब्द मिळणं अवघड आहे. ढोबळ अर्थानं जी व्यक्ती स्वतःच्या समलैंगिकतेला स्वीकारते आणि अभिमानानं आजूबाजूच्या लोकांना सांगते या प्रक्रियेला 'कमिंग आऊट' असे म्हणतात. अनेक भिन्नलिंगी व्यक्ती मला विचारतात, की “तू सगळ्या लोकांना का सांगत फिरतोस की तू समलिंगी आहेस म्हणून? आम्ही भिन्नलिंगी आहोत असे सांगत फिरतो का? तू तुझ्यापुरतं ठेव ना. जगजाहीर कशाला करायचं?" याचं उत्तर असं की भिन्नलिंगी लोक आपण भिन्नलिंगी आहोत हे बोलत नाहीत कारण आपल्या आजूबाजूला सगळे भिन्नलिंगी आहेत हेच गृहीत धरलं जातं. कायदा, धर्म, संस्कृती या सर्व गोष्टी भिन्नलिंगी जीवनशैलीचाच विचार करून बनवल्या आहेत. आपण जे आहोत ते लपवून ठेवणं म्हणजे आपल्यात काहीतरी वैगुण्य आहे ते झाकायचा प्रयत्न करणं आहे.

 'आऊट' व्हायचं की नाही हे ठरवायला अनेक दिवस लागतात. 'आऊट' व्हायचे परिणाम काय होतील याचा नीट विचार करावा लागतो. 'हमसफर ट्रस्ट चे संचालक विवेक आनंद म्हणाले, “मी समलिंगी मुला/मुलींना नेहमी सांगतो, जोवर तुम्ही तुमची लैंगिकता पूर्णपणे स्वीकारत नाही, स्वतःचं शिक्षण पूर्ण करून


मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

५३