पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मग बहुतेकजण घरच्यांच्या दबावामुळे व सामाजिक मान्यतेसाठी लग्न करायचा निर्णय घेतात. आपल्या भावना, इच्छा दाबून टाकल्या जातात. एखाद्या यंत्रासारखं, भावनाशून्य होऊन हे नातं उभं करायचं ठरवतात. जाण असते की आपण आपल्या होणाऱ्या जोडीदाराची फसवणूक करत आहोत. याचा अपराधीपणाही असतो. पण समजामान्यतेपोटी कोणाचाही बळी दयायची तयारी असते.

  लेस्बियन स्त्रीचं पुरुषाशी लग्न झालं की नवयानं तिच्याबरोबर केलेला संभोग म्हणजे तोंड दाबून बलात्कार केल्यासारखं असतं. तिला हा प्रकार किळसवाणा वाटतो पण ब्र काढता येत नाही. समलिंगी पुरुषाचं लग्न ठरलं की त्याला काळजी असते की ज्या व्यक्तीबद्दल काहीही भावनिक व लैंगिक इच्छा नाहीत अशा व्यक्तीबरोबर लैंगिक संबंध करायला जमतील का? काहीजण वेश्येबरोबर संभोग करून आपल्याला जमतंय का हे बघतात. काही समलिंगी पुरुषांना स्त्रीबरोबर संभोग करायला जमतो तर काहींना जमत नाही. जर स्त्रीबरोबर संभोग करताना लिंगाला ताठरपणा आला नाही तर अजून दडपण वाढतं. जर संभोग जमला तर त्यांना आत्मविश्वास येतो, की निदान कर्तव्यापुरता बायकोबरोबर संभोग करता येईल.

लग्न झालं की दडपण मूल होण्याचं असतं. एकदा का मूल झालं की पुरुष सामाजिक दडपणापासून मुक्त होतो. एकजण म्हणाले, "माझ्या मित्राने मला सांगितलं, 'तुझं काहीही असू देत. एक मूल काढ, बस! मग तू कोणाबरोबर काहीही करण्यास स्वतंत्र आहेस. तुला कोणीही काहीही बोलायची टाप नाही.'

 लग्न झाल्यापासून पुढचं सगळं आयुष्य बायकोसमोर मुखवटा घालून जगावं लागतं. लग्नाच्या जोडीदाराबरोबर शारीरिक व भावनिक सुख मिळत नाही, म्हणून कोणाला कळणार नाही अशा बेतानं समलिंगी जोडीदार शोधावा लागतो. जर कोणाला कळलं तर ब्लॅकमेलच्या आहारी जावं लागतं. अनेक उदाहरणं आहेत जिथे समलिंगी जोडीदार लैंगिक संबंध ठेवतो व नंतर 'तुझ्या घरच्यांना सांगेन' किंवा '३७७ कलमाखाली तू माझ्यावर जबरदस्ती केलीस म्हणून फिर्याद करीन' अशी धमकी देऊन ब्लॅकमेल केलं गेलं आहे. अशी अनेकांची हजारो रुपयांची लुबाडणूक झालेली आहे.

आपल्या लैंगिकतेचा अभिमान

 स्वतःची लैंगिकता स्वीकारणं अवघड असतं. समाजानं दिलेले स्वतःबद्दलचे नकारात्मक संकेत धुडकारून स्वतःची नव्यानं ओळख करणं सोपं नसतं. स्वतःचा स्वीकार होण्यास समलिंगी आधार संस्था, आदर्श समलिंगी व्यक्तींचा आधार मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. याचा आधार घेऊन जेव्हा ती व्यक्ती स्वतःला पूर्णपणे स्वीकारते तेव्हा तिची स्वप्रतिमा बदलते. ती व्यक्ती हळूहळू स्वतःवर प्रेम

५२

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख