पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहेत, समलिंगीद्वेष्टे आहेत. यातले अनेकजण 'इगो-सिंटोनिक / इगो- डिस्टोनिक'ची भाषा करतात. हे मानसोपचारतज्ज्ञ मानतात की समलैंगिकता दोन प्रकारची असते. एक प्रकार ज्याला 'इगो-सिंटोनिक' म्हणतात. अशा व्यक्तींना आपण समलिंगी आहोत याचा काही त्रास होत नाही. ते आपली लैंगिकता स्वीकारतात. दुसरा गट आहे ज्याला 'इगो-डिस्टोनिक' म्हणतात. या गटातल्यांनी आपली समलैंगिकता स्वीकारलेली नसते. त्यांना ती बदलाविशी वाटते आणि अशा लोकांना बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी धारणा अनेक मानसोपचारतज्ज्ञ बाळगतात. आता जिथे सगळा समाज, धर्म, कायदा समलिंगी असणं हा आजार आहे, विकृती आहे, पाप आहे असं मानतो, अशा वातावरणात वाढणारा/वाढणारी व्यक्ती 'इगो-डिस्टोनिक'च असणार. मीही होतो, पण एकदा मला माझ्यासारखी लोकं भेटली, आपल्यात काही वाईट नाही, विकृती नाही, कमी नाही हे जाणवलं की मी 'इगो-र्सिटोनिक' झालो. त्यामुळे या मानसोपचारतज्ज्ञाचं 'इगो- डिस्टोनिक' / 'इगो-सिंटोनिक' वर्गवारीचं धोरण दुटप्पी आहे, नुसती बुवाबाजी आहे. मानसोपचारतज्ज्ञांनी समलैंगिकतेला आजार मानणं हा अडाणीपणा आहे.

 जर समलिंगीद्वेष्ट्या मानसेपचारतज्ज्ञाकडे गेलं तर तोटाच होतो. या डॉक्टरांना समलिंगी लैंगिक कल अमान्य असल्यामुळे जास्तच नैराश्य येतं. हे मानसोपचारतज्ज्ञ समलिंगी लैंगिक कल आजार आहे असं सांगून औषधं, शॉक, कॉन्सेलिंग करून लैंगिक कल बदलायचा प्रयत्न करतात. अर्थात याला अजिबात यश येत नाही. आजारच नाही तर औषधाचा काय उपयोग? यांचा यशाचा मापदंड कोणता? तर समलिंगी व्यक्तीला विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीशी संभोग करता आला पाहिजे म्हणजे त्या व्यक्तीला लग्न करता येईल. ज्या व्यक्तीबद्दल कोणतंही भावनिक व शारीरिक आकर्षण नाही अशा व्यक्तीबरोबर संसार करण्यास प्रोत्साहन देणं म्हणजे कोणत्या नरकात आपण क्लायंटला ढकलतोय याचा या डॉक्टरांनी कधी विचार केला आहे का ? आणि हे स्वत:ला मानसिक आरोग्याचे ज्ञानी समजतात.

 सुदैवानं इथे आशेचा किरण दिसू लागला आहे. मला मागच्या ५-७ वर्षांत उदारमतवादी मानसोपचारतज्ज्ञ भेटू लागले आहेत. डॉ. कौस्तुभ जोग म्हणाले, “समलिंगी असणं हा आजार किंवा विकृती नाही. त्यामुळे त्याच्यावर औषधोपचार करून हा कल बदलण्याचा प्रश्नच येत नाही आणि जरी कोणी तो प्रयत्न केला तरी त्याला यश अजिबात येत नाही. कल बदलण्याच्या भानगडीत न पडता त्या व्यक्तीला व तिच्या घरच्यांना त्या व्यक्तीचा लैगिंक कल स्वीकारण्यास मदत केली पाहिजे."

 लग्नाचं वय झालं की आपल्या लैंगिकतेचं दडपण अजूनच वाढतं. घरच्यांचा लग्नाचा दबाव वाढतो. जेवढं शक्य आहे तेवढं लग्न टाळायचा प्रयत्न होतो. पण


मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

५१