पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

थोडंसुद्धा मुलींबद्दल आकर्षण वाटत नाही, हे मुलांना जाणवायला लागलं की त्यांना खूप त्रास होऊ लागतो. एकजण म्हणाले, “मी नट्यांना मनात आणून हस्तमैथुन करायचा प्रयत्न करायचो. एकदाही मला ते जमलं नाही. ती नटी निसटून जायची आणि एखादा चांगला दिसणारा नट समोर यायचा. आपण बदलणार नाही हे लक्षात येऊ लागलं तशी मनात भीती व चीड येऊ लागली. या रागातून क्षुल्लक कारणांवरून चिडचिड, भांडणं, हातून तोडफोड व्हायची. मित्रांचं चांगलं झालेलं बघवायचं नाही. त्यांचा खूप मत्सर वाटायचा, द्वेष वाटायचां."

 आपण इतरांसारखे नाही आहोत ही भावना मनात रुजली की काहीजणांचा स्वभाव एकलकोंडा बनायला लागतो. मित्र, मैत्रिणी नकोसे होतात. अभ्यासातून, शिक्षणातून लक्ष दूर होत जातं, घरच्यांपासून अंतर पडू लागतं. 'घरच्यांना कळलं तर त्यांना किती दुःख होईल', 'कशाला शिकायचं?, कशाला जगायचं?' अशा विचारांनी आपली लैंगिकता आपल्याला पूर्णपणे ग्रासते. आपल्या मुलाला कोणत्याच गोष्टीची फिकीर नाही हे बघून घरचे चिडतात, घरात भांडणं होतात. घरच्यांचे शिव्याशाप खायचीच आपली लायकी आहे असं वाटू लागतं. स्वत:बद्दल खूप द्वेष वाटत असतो.

 या अशा वेळी मन खूप हळवं असतं, कोणताच आधार नसतो, मनाचा कोंडमारा असह्य होतो. कोणीतरी आपल्याला स्वीकारणारं असावं म्हणून मन झुरत असतं. अशावेळी एखादया समान लिंगाच्या चांगल्या स्वभावाच्या व्यक्तीवर प्रेम जडायची शक्यता असते. ती व्यक्ती समलिंगी आहे का नाही हे काहीच कळायला मार्ग नसतो. शक्यता असते की ती व्यक्ती भिन्नलिंगी लैंगिक कलाची असणार. म्हणून मग ते प्रेम बोलूनही दाखवता येत नाही. ज्याच्यावर 'सायलेंट' प्रेम आहे तीच व्यक्ती आयुष्याचा केंद्रबिंदू बनते. स्वतःची लैंगिकता स्वीकारलेली नसते व त्या व्यक्तीनं आपल्याला स्वीकारावं ही इच्छा असते. जर त्याला कळलं व त्याने झिडकारलं तर कमालीचं नैराश्य येतं. काहीजण आत्महत्येपर्यंत जातात.

 हे मनातलं काहूर कोणापाशी एका शब्दांनही बोलता येत नाही. सगळ्या भावना इतरांपासून लपवून ठेवाव्या लागतात. या सगळ्या कोंडमान्यामुळे मनोबल पूर्णपणे खचतं. हा त्रास आपल्या समलैंगिकतेमुळे आहे व या त्रासातून आपली सुटका व्हावी म्हणून काहीजण देवाला नवस बोलतात, काहीजण उपासतापास करतात, काही संन्यास घेतात, आपण अध्यात्मात स्वतःला वाहून घेऊ, आपलं पाप शांत करू, या विचारांपासून मुक्त होऊ असा विचार करतात. काहीजण स्वतःचा लैंगिक कल बदलण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांकडे जातात. पाश्चात्त्य देशातील बदल बहुतेक भारतातील मानसोपचारतज्ज्ञांपर्यंत पोहोचलेले नसल्यामुळे भारतातील बहुतेक मानसोपचारतज्ज्ञ आजही अत्यंत सनातनी विचारांचे



५०

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख