पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आकर्षण कोणी शिकवलं नाही, लहानपणी कोणी माझं लैंगिक शोषण केलं नाही. जसं अनेक लोक भिन्नलिंगी का होतात हे माहीत नाही, तसंच मी समलिंगी का झालो हे मला माहीत नाही. विचारणाऱ्याला लोक भिन्नलिंगी का होतात हा प्रश्न पडत नाही.

  लैंगिक शोषणामुळे एखादा मुलगा किंवा मुलगी समलिंगी बनते हा समजही सर्वस्वी चुकीचा आहे. लेस्बियन (समलिंगी स्त्रीला 'लेस्बियन' म्हणतात) अॅक्टिव्हिस्ट गीता कुमाना म्हणाल्या, की “एखादया मुलीचं पुरुषाकडून लैंगिक शोषण झालं किंवा तिच्यावर बलात्कार झाला म्हणून, किंवा एखादया पुरुषाकडून हिंसा झाली म्हणून कोणतीही स्त्री समलिंगी बनत नाही. पुरुषाकडून एखाद्या स्त्रीवर लैंगिक अत्याचार झाले तर तिला पुरुषाबरोबर लैंगिक जवळीक साधायची भीती वाटेल पण ती लेस्बियन बनणार नाही."

  काही वेळा लोक विचारतात, की “पहिला संभोग समलिंगी झाला म्हणून एखादी व्यक्ती समलिंगी बनू शकते का?" नाही. मला एकजण म्हणाला, “बोर्डिंग स्कूलमध्ये असताना वयात आल्यावर माझे एका मुलाबरोबर शरीरसंबंध व्हायचे. ते आवडायचेही, पण काही काळाने मला ते आवडेनासे झाले व मला फक्त मुलीच आवडू लागल्या. आता मला पुरुषांबद्दल कोणतचं आकर्षण वाटत नाही. ती वयात आल्यावरची पासिंग फेज होती.”

  काही पालकांना वाटतं, की आपल्या समलिंगी मुलाचं स्त्रीशी लग्न झालं, तिच्याशी त्याने संभोग केला की त्याला ती आवडायला लागेल व त्याचा लैंगिक कल बदलेल. हाही समज पूर्णपणे चुकीचा आहे. अनेक समलिंगी पुरुष समाजाच्या दबावामुळे लंग्न करतात पण तरी त्यांना भिन्नलिंगी संभोग अजिबात आवडत नाही, त्यांची भावनिक व शारीरिक गरज स्त्रियांबरोबर पुरी होत नाही. ते पुरुषाशीच मानसिक व शारीरिक जवळीक साधायचा प्रयत्न करतात.

समलिंगी जीवनशैली

  वयात येताना वर्गातील बहुसंख्य मुलं मुलींकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होतात, बहुसंख्य मुलीही मुलांकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होतात. पण समलिंगी मुला/मुलींना विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींबद्दल अजिबात आकर्षण वाटत नाही. एकजण म्हणाले, "वर्गातील मुलं बाकड्यावर, मुतारीत मुलींची अश्लील चित्रं काढायची, बायकांच्या नग्नतेबद्दल बोलायची, हे सगळं मला घाण वाटायचं.”

  इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत हे जसंजसं जाणवायला लागतं तसं काहीजणांना खूप मानसिक त्रास व्हायला लागतो. सुरुवातीला ही एक तात्पुरती फेज आहे, ती आपोआप जाईल अशी आशा असते. पण २-३ वर्षं झाली तरी आपल्याला

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

४९