पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यक्तींबद्दल आकर्षण असावं, दोन्ही लिंगाच्या व्यक्तींबद्दल आकर्षण वाटणं चुकीचं आहे अशी अनेकांची धारणा असते. दोन्ही लिंगाच्या व्यक्तींबद्दल आकर्षण असणं हा मुळात गोंधळ नाही. एकाच लिंगाच्या व्यक्ती लैंगिकदृष्ट्या आवडल्या पाहिजेत असा काहीही नियम नाही. माझ्या माहितीचे अनेक पुरुष व स्त्रिया उभयलिंगी जीवनशैली जगतात. यात कोणताही गोंधळाचा भाग नाही. आपण एकाच चौकटीत बसत नाही याचा स्वतःला त्रास करून घेऊ नये. निसर्गाने तुम्हांला दोन्ही लिंगाच्या व्यक्तींबद्दल आकर्षण असण्याची देणगी दिली आहे.

  डॉ. किनर्सेच्या सर्वेक्षणानंतर अनेकांनी लैंगिकतेवर सर्वेक्षणं केली. वेगवेगळे आकडे समोर आले. लैंगिक कलाची नक्की टक्केवारी सांगणं अवघड असलं तरी सर्वसाधारपणे सर्व जगात ३% पुरुष पूर्णपणे समलिंगी असतात व १ ते १.५% स्त्रिया पूर्णपणे समलिंगी असतात असं मानलं जातं.

  मग हे भारतातील समलिंगी पुरुष व स्त्रिया आहेत कुठे? पूर्वी हा विषय काढायचं कोणी धाडस केलं नव्हतं. जिथे भिन्नलिंगी संबंधांबद्दल बोलायची अडचण असायची तिथे समलिंगी विषयाबद्दल बोलायचं धाडस कोण करणार? जसंजसं काही पाश्चात्त्य देशात समलिंगी लोकांनी आपले अधिकार मिळवण्यासाठी चळवळ सुरू केली तसंतसं त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारतात अशोकराव कवी (भारतातील पहिले 'गे' अॅक्टिव्हिस्ट) यांनी आपण समलिंगी आहोत हे उघडपणे जाहीर केलं व भारतातील समलिंगी समाजासाठी ते काम करू लागले. कालांतरानं इतरजणही या कामात सामील झाले. त्यातला मी एक.

  "हल्ली तुम्ही लोक खूप वाढायला लागले आहात." असं मला अनेकजण म्हणतात. आजवर जे छुपेपणानं आपलं आयुष्य जगत होते ते आज खुलेआमपणे आपली समलैंगिकता जाहीर करू लागले आहेत. याचा अर्थ आमची संख्या वाढली असं नाही. आमची संख्या खूप कमी आहे व कमीच राहणार आहे, पण त्यातील जास्तजण उघडपणे समाजासमोर आपली लैंगिकता सांगू लागले आहेत, आपले अधिकार मागू लागले आहेत.


समलैंगिकतेची कारणं

 मला अनेकवेळा विचारलं जातं, “काहीजण समलिंगी का होतात?" किंवा “तुम्ही समलिंगी कसे झालात ?" सर्व लैंगिक कल तेवढेच नैसर्गिक आहेत, अनेकांना पटत नाही. म्हणून ते समलिंगी कलाची विविध कारणं शोधायचा प्रयत्न करतात. 'लहानपणी याचं लैंगिक शोषण झालं असेल म्हणून तो समलिंगी बनला ' किंवा 'लहानपणी याला मुलींचे कपडे घातले असतील म्हणून तो समलिंगी बनला ' असे अनेक तर्क काढले जातात. हे सर्व तर्क चुकीचे आहेत. मला समलिंगी


४८

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख